हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या – चंद्रकांतदादा पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । मुंबई । सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला – बुलढाणा – वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

विधान परिषद निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला – बुलढाणा – वाशिम मतदारसंघातून विजयी झालेले वसंत खंडेलवाल यांचे मा. प्रदेशाध्यक्षांनी हार्दिक अभिनंदन केले. विधान परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजपाचे मुंबईतून राजहंस सिंह आणि धुळे – नंदूरबार मतदारसंघातून अमरिश पटेल बिनविरोध विजयी झाले असून पक्षाने एकूण सहापैकी चार जागा जिंकल्या आहेत. भाजपाला मुंबई आणि अकोला – बुलढाणा – वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत. मा. प्रदेशाध्यक्षांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून निवडणुकीत मतदानाची संधी मिळताच जनता भाजपाला मतदान करते. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने ते त्या त्या पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपाला मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची या लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे.

त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आमदारांच्या गुप्त मतदानाने करावी, असा विधानसभेचा मूळ नियम आहे आणि तसा प्रघातही आहे. आघाडीला आपल्याच आमदारांची खात्री नसल्याने नियम बदलून आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपले महाविकास आघाडीला आव्हान आहे की, त्यांनी मूळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि आमदारांना गुप्त मतदानाची मुभा द्यावी, मग त्यांना कळेल की अध्यक्ष कोण होतो.

भाजपाने सहकार्य केल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही विधान परिषद निवडणूकही बिनविरोध करावी असे ठरले होते व त्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये उमेदवार मागे घेतला पण काँग्रेसने ठरल्याप्रमाणे पूर्ण सहकार्य केले नाही. त्या पक्षाने नागपूरच्या जागेवर निवडणुकीचा आग्रह धरला आणि अखेरीस पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!