महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठापुढं पुढील सुनावणी येत्या 27 सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणत्या गटाला द्यावे, याबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. 23 ऑगस्टपासून प्रलंबित असलेली सुनावणी बुधवारी घटनापीठापुढं झाली. या घटनापीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा केलाय. बाळासाहेब ठाकरे ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर विचार आहेत. आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वासदार जरूर असतील. पण, आम्ही वैचारिक वारसादार आहोत. चिन्हं रुजवायला वेळ जाईल. पण, आमची शिवसेना शाखांपर्यंत जाईल, असंही देसाई म्हणालेत.
‘चिन्हं नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी’
धनुष्यबाण चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडं आहे. आमदार-खासदार, नगरसेवक, सरपंचाचं बहुमत आमच्याकडं आहे. लोकांमधून आलेले लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडं आहे. त्यामुळं आम्हालाच चिन्हं मिळेल, अशी कोर्टाकडून आशा आहे. चिन्हं नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी आहे. ज्वलंत हिंदुत्व कुणाकडे आहे हे लोकांना माहीत आहे. आमचं हजारो लोकांनी स्वागत केलं. लोकं आमच्या स्वागताला आजही येत असतात. आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आहेत, असं म्हणत धनुष्यबाण आमचाच असल्याचं देसाईंनी ठणकावून सांगितलंय.