विनाकारण फीरणे, गर्दी करणे टाळून कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन
स्थैर्य, सातारा, दि. ०३ : जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. आपल्या देशातही या साथीचा प्रसार होत असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. सातारा जिल्ह्यासह सातारा शहरातही आता कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. गेले दोन- तीन महिने लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होवून लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र लोकांना गांभिर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विनाकारण फीरणे, गर्दी करणे अंगलट येत आहे. स्वत:ला मर्यादा घालून स्वयंशिस्त न पाळल्यास कोरोनाचे संकट अधिक गडद होणार असून तसे झाल्यास पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन ओढावून घ्यावा लागेल, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.
कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. कोरोना साथीला आळा घालण्यासाठी संपुर्ण देशात दोन ते तीन महिने लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद होती. छोटे- छोटे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने हजारो- लाखो लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. हातावर पोट असणार्या असंख्य लोकांची उपासमार होत होती. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र गेल्या आठ- दहा दिवसांत सातारा जिल्हा आणि सातारा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच असून ही मोठी चिंताजनक बाब आहे. नागरिक स्वत: मर्यादा पाळत नाहीत, स्वत:ची काळजी घेत नाही, हे महत्वाचे कारण म्हणावे लागले.
बाजारपेठ उघडी आहे, मार्केट खुले आहे म्हणून विनाकारण अनेक लोक फीरतात, गर्दी करतात. मला काय होणार नाही या ब्रह्मात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे, असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रुग्णसंख्या आहे. कोरोना आपल्या दरवाजात येवून पोहचला आहे. आतातरी जागे व्हा. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल, अशी कळकळीची सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केली आहे. कोणीही विनाकारण बाहेर फीरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे. वाढती रुग्णसंख्या चिंताजनक बाब आहे. कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. स्वत:च स्वत:ची काळजी घेतली पाहिजे तरच कोरोनापासून बचाव होणार आहे. रुग्णसंख्या वाढतच राहिली तर मात्र पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे आणि हा लॉकडाऊन स्वत: लोक ओढावून घेणार आहेत. पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थती नको असेल तर, लोकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि कोरोनपासून स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी विनाकारण बाहेर फीरू नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेला केले आहे.