स्थैर्य, सातारा, दि.२ : मराठा समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टया मागासलेल्यांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढा देऊया. आम्हांला दूस-या समाजाचे आरक्षण काढून द्या असे आम्ही म्हणत नसून आम्हांला आमचे द्या अशीच आपल्या सर्वांची मागणी आहे. आपल्या नव्या पिढीवर आरक्षणाचा परिणाम हाेत आहे. त्यांना न्याय मिळवू देणे हे आपले कर्तव्य असून हा लढा ताकदीने लढूया असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी स्पष्ट केले.
साताऱ्यातील कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेस आज (साेमवार) प्रारंभ झाला. या परिषदेस आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी उपस्थिती लावली आहे. त्यावेळी आयाेजकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे जाेरदार स्वागत केले. त्यानंतर उपस्थितांसमाेर शिवेंद्रसिंहराजेंनी भूमिका मांडली. ते म्हणाले, आमदार म्हणून अथवा राजे म्हणून मी येथे आलाेले नाही. मी मराठा समाजातील घटक म्हणून आलाे आहे. मराठा समाजाच्या लढ्याला यश येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत. त्यास पाठींबा आहे.
आजच्या परिषदेत आपण ठराव मांडणार आहात. सातारा जिल्ह्यातील सर्व मराठा समाज मराठा आरक्षणाबाबत आपल्या बराेबर हाेता, आहे आणि राहील असे ठामपणे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. आरक्षणामुळे आजच्या पिढीवर फार माेठा परिणाम हाेत आहे. या सर्व गाेष्टींचा विचार राज्य सरकार असेल अथवा केंद्र सरकार. खरं तर सर्वच पक्षांनी हा विचार केला पाहिजे. युवा वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यथा भविष्यात महाराष्ट्रातील सामाजिक घडी विस्कटलेली असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी भितीही शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली. यावेळी सुरेशदादा पाटील, विजयसिंह महाडिक यांच्यासह मराठा समाजातील शेकडाे कार्यकर्ते उपस्थित हाेते.