कृष्णाच्या डिस्टीलरीला 30 कोटींचा नफा झाला तर एफआरपीची थकीत रक्कम जमा करा; अविनाश मोहिते यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८ : य. मो. कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या सभेत डिस्टीलरीला 30 कोटी नफा झाल्याचे त्यांनी जाहीर केले. नफा झाला असल्यास व अजूनही होत असल्यास त्यांनी सुमारे 45 कोटी रुपयांची एफआरपीची थकीत रक्कम तातडीने सभासदांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली.

कराड येथे शनिवारी 27 रोजी कृष्णा कारखान्याच्या वार्षिक सभेसह कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना विचारलेल्या प्रश्नांबाबत माहिती देण्यासाठी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थापक पॅनेलचे संचालक उपस्थित होते.

अविनाश मोहिते म्हणाले, अध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत कामकाज तीस-चाळीस मिनिटांत संपविले. चालू वर्षीची राहिलेली एफआरपी कधी देणार? व कामगारांच्या मागण्या याबद्दल त्यांनी चकार शब्दही काढला नाही. तसेच सभेपुढे आलेल्या 59 प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरही दिले नाही. आमचे त्यांच्यासाठीचे सभेत विचारलेले प्रश्न आजही कायम आहेत. 55 कोटी रुपये खर्चून कारखान्याचे आधुनिकीकरण केले. त्यामुळे 11 ते 12 हजार मे. टन गाळप प्रतिदिनी होईल, असे वार्षिक अहवालामध्ये जाहीर केले. मग, प्रत्यक्षात 200 ते 400 टनच ऊस जादा का गाळला जातोय. याबद्दल अध्यक्षांनी कारखान्याचा उतारा वाढल्याचे सांगितले. तसे असेल तर 55 कोटींचा खर्च उतारा वाढवायला केला होता की गळीत वाढवायला? गळीत वाढले नसेल तर 11 ते 12 हजार टन गाळप होईल, अशा बढाया वार्षिक अहवालाच्या भाषणात त्यांनी कशासाठी केल्या? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते म्हणाले, स्वागत, प्रास्तविक, ठराव वाचन, 59 प्रश्नांपैकी दोन-चार प्रश्नांची थातूर-मातूर उत्तरे देऊन खुद्द अध्यक्षांनीच ‘आता सभा संपवूया’ असे म्हणणे हास्यास्पद होते. प्रश्नकर्त्यांना उपप्रश्न विचारायची संधी न देता त्यांचे माईक काढून घेतले. सभा ऑनलाईन असली तरी एकाही सभासदाला त्यात सहभागी होता आले नाही. त्यामुळे ही सभा एक सोपस्कारच होती. सभेला आमच्यासारख्या संचालक व विरोधकांची समोर पूर्णवेळ असलेली उपस्थिती त्यांना खूपच झोंबल्याचे सभेत ऑनलाईन सहभागी झालेल्या सभासदांनी पाहिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोहिते म्हणाले, कारखान्याची सप्टेंबर 2019 सर्वसाधारण सभा झाली होती. त्या सभेसाठीही उपस्थित राहण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण त्यावेळी भाजपचे सरकार असल्याने प्रशासनाचा वापर करुन आम्हाला सभास्थळी प्रवेशच करु दिला नाही. यावेळी सभा ऑनलाईन होती. आम्हाला ऑनलाईन सहभागी होणे शक्य होते. मात्र, सभासदांनी निवडून दिल्याने आम्ही प्रत्यक्ष सभेत सहभागी झालो. तत्पूर्वी मुदतीत लेखी स्वरुपात आम्ही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे त्यांनी दिली नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. संस्थापक पॅनेलच्या काळात कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प जवळ-जवळ कर्जमुक्त केला. त्या पाच वर्षाच्या काळात 15 कोटी 82 लाख युनिट वीज मंडळाला विकली. मात्र, विद्यमान अध्यक्षांच्या काळात त्यात वाढ व्हायऐवजी 2 कोटी 82 लाख युनिटची घटच झाली. हे अपयशच आहे होय ना? असा सवाल करीत पाच वर्षात विजेची विक्री किती झाली, याचा अहवाल बघून त्यांनी खुलासा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले, आम्ही सभेच्या निमित्ताने मांडलेले प्रश्न हजारो सभासदांपर्यंत पोहोचले आहेत. त्याची उत्तरे देताना विद्यमान अध्यक्षांना गैरसोयीचे वाटत आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टबद्दलचे प्रश्न तीस वर्षापासूनही लोकांच्या मनात कायम आहेत. या ट्रस्टमधील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व सभासदांच्या मुलांसाठी प्रवेश राखीव होता. आता कायदे बदलले आहेत. मात्र, व्यवस्थापनाचा कोटा कायम आहे. कारखान्याच्या मालकीच्या कृषी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून कार्यक्षेत्रातील व सभासदांच्या मुलांनाच प्रवेश दिला जातो. कारखान्याशीच संबंधित व 100 टक्के कारखान्याच्या पैशातून उभ्या राहिलेल्या ट्रस्टच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेल्या व्यवस्थापन कोट्यातून सभासद व कार्यक्षेत्रातील मुला-मुलींना प्रवेश द्यावा. तसा ठरावही त्यांनी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत करावा, अशी आमची मागणी होती. परंतु, त्यालाही त्यांनी काहीच उत्तर दिले नसून त्यांनी अजूनही त्याचे उत्तर द्यावे, अशीही मागणी अविनाश मोहिते यांनी यावेळी केली.
रेठरे पूल मंजूर झाला त्याबद्दल उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि पोटनियमातील दुरुस्ती, सभेसाठीची उपस्थिती क्षमापित करणे हे ठराव आम्हाला मांडायची संधी सर्वसाधारण सभेत मिळू शकली नाही.

एकत्रीकरणावर नंतर बोलू…
सध्या कृष्णा कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रात इंद्रजीत मोहिते आणि तुमच्या एकत्रीकरणाची जोरदार चर्चा आहे. याबाबत त्यांना छेडले असता त्यांनी यावर नंतर सविस्तर बोलू, अशी प्रतिक्रिया देत महाआघाडीची लढत चालेल का? तत्सम प्रश्नावरही त्यांनी फक्त आठ दिवस थांबा, यावर सविस्तर बोलणार असल्याचे सूचक विधान केले आहे.

… यावरून कारखान्याचा कारभार कसा चालतो हे कळते
कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला संस्थापक पॅनेलच्या संचालकासह मी पूर्णवेळ उपस्थित होतो. सभा ऑनलाईन असल्याने त्यात काही सभासद ऑनलाईन सहभागी होते. परंतु, त्यांना आपली मते का मांडू दिली नाहीत. सभेच्या ठिकाणी पोलीसांकरवी संचालकांच्या टेबलावरील माईक काढून घेतले. तसेच माझी खुर्चीही जाणून-बुजून लांब ठेवली. आम्ही विरोधक असल्याने आम्हाला बोलू द्यायचे नसेल हे समजू शकतो. पण सत्ताधारी गटातील संचालकांनाही बोलायची बंदी का? असा सवाल उपस्थित करत यावरून कारखान्याचा कारभार कसा चालतो; हे कळते, अशी खोचक टीकाही अविनाश मोहिते यांनी यावेळी केली.

धर्मकाट्याची पोलखोल…
संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते व कृष्णा कारखान्याचे सभासद प्रशांत पवार यांनी कृष्णाच्या धर्मकाट्याची पोलखोल याच पत्रकार परिषदेत केली. ही पोलखोल करण्यासाठी त्यांनी एका सभासदाची प्रचार संपर्कदौर्‍यातील वक्तव्याची ऑडिओ क्लीप पत्रकारांना माईकवरून ऐकवली. यात संबंधीत सभासद हा सभेत कृष्णाचा काटा एकदम करेक्ट आहे असे म्हणतो. शेजारच्या कारखान्यात वजन कमी भरते. पण कृष्णेत एक टन उसाचे वजन 1 हजार 40 किलो भरते असे सांगताना दिसत आहे. ऊस उत्पादकाला प्रतिटन 40 किलो वजन जास्त वजन देणार कृष्णाचा धर्मकाटा असल्याचे सांगत आहे. याविषयी बोलताना प्रशांत पवार म्हणाले, अशापध्दतीने शेतकरी सभासदांची दिशाभूल आणि या धर्मकाट्यातून कारखान्याचा तोटा होत असल्याचे स्पष्ट होते. या काट्यातील फरकाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, सभासदांची दिशाभूल करण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे या पुराव्यावरून स्पष्ट होत आहे.


Back to top button
Don`t copy text!