दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२१ । फलटण । माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वराज साखर कारखाना प्रा. लि. उपवळे ता. फलटण या साखर कारखान्याने 2018 – 19 मधील थकीत ऊस बिलाची उर्वरित रक्कम अदा न केल्यास आपण आत्मदहन करणार असल्याचे फलटण शहर शिवसेना प्रमुख रणजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला.
विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत रणजित कदम यांनी सांगितले की, 2018-19 मध्ये स्वराज साखर कारखाना उपवळे या कारखान्यास ऊस उत्पादक शेतकर्यांनी ऊस घातला होता. त्यावेळीच्या ऊसाचे 300 रुपये देणे बाकी होते. याबाबत च्या तक्रारी फलटण शहर शेवसेना प्रमुख रणजित कदम यांच्याकडे आल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. तसेच साखर आयुक्तालय येथे तक्रार केली. त्याचा पाठपुरावा करून कारखान्यास ऊस बिल देण्यास भाग पाडले. तालुक्यातील शेकडो शेतक-यांना ऊस बिले मिळवून दिली. सर्व शेतकर्यांची बिले देण्यात आली. शिवसेना पदाधिकारी रणजित कदम यांनी देखील या कारखान्यास ऊस घातला होता. रणजित कदम यांनी आवाज उठवला म्हणून जाणूनबुजून वैयक्तिक आकसापोटी त्यांचे 300 रुपये प्रति टन उर्वरित रक्कम आज अखेर दिलेली नाही.
त्यानंतर माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता थकीत बिल देण्यास आम्हाला नकार देऊन डावलण्यात आले म्हणून साखर आयुक्तालय येथे तक्रार दिली. त्यामध्ये साखर कारखाना व आमच्यात तक्रारीच्या अनुषंगाने तारखा झाल्या त्यामध्ये साखर आयुक्तालय यांनी सांगितले कि जर इतर कारखान्याने 300 रुपये उर्वरित रक्कम जर सर्व शेतकर्यांना दिली असेल तर रणजित कदम यांना देखील 300 रुपये रक्कम देण्यात यावी. एकास एक न्याय व एकास दुसरा न्याय असे निसर्ग तत्वावर चालत नाही. असा साखर आयुक्तालय पुणे यांनी निकाल दिला आहे. तरी सुध्दा आज अखेर 17 सप्टेंबर 2021 अखेर आम्हाला उर्वरित रक्कम मिळाली नाही. आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने कारखान्याच्या विरोधात आवाज उठवल्याने जाणून बुजून वैयक्तिक आकस ठेवून आमचे थकीत बिल मुद्दाम थांबविले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला पाझर फुकट नाही हे कसले राजकारण ? पंतप्रधान मोदी साहेब तुम्हीच उत्तर द्या. कृषिप्रधान देश म्हणून मिरवणार्या भारतात बळीराजाला केंद्र सरकार मधील खासदार केराची टोपली दाखवत असतील तर मरण्याशिवाय पर्याय उरत नाही. तर येत्या काही दिवसात माझे थकीत ऊस बिल मिळाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत असे यावेळी सांगितले. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना भेटून माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वराज साखर कारखाना प्रा. लि. उपवळे ता. फलटण ची सविस्तरपणे तक्रार दाखल करणार आहोत असे कदम यांनी सांगितले. यावेळी फलटण तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, माथाडी ता. प्रमुख नंदकुमार काकडे, माथाडी कामगार संपर्क प्रमुख सुशीला जाधव, फलटण उपशहर प्रमुख राहुल पवार व फलटण उपशहर प्रमुख रोहित इंगळे उपस्थित होते.