स्थैर्य, औरंगाबाद, दि.४: औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी विविध पक्षांकडून केली जात आहे. अशात औरंगाबाद महानगरपालिकेत सत्ता आली तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नामकरण करू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबादचे नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असेही ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद महानगरपालिकेने नामकरणासाठी नवा प्रस्ताव द्यावा लगणार आहे. महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करून देतो, असे म्हणत एक आश्वासनच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
काँग्रेस शिवसेनेला चंद्रकांत पाटलांचा सल्ला
चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली. सरकार चालविण्यासाठी शिवसेनेला जशी काँग्रेसची गरज आहे तशी काँग्रेसला शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे दोघांनी सामंजस्याने तोडगा काढावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.