दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । फलटण । समस्त ग्रामस्थ आणि नवतरुण मंडळ, पसूचा मळा, डीस्कळ, ता. खटाव यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या श्री काळभैवनाथ मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण समारंभाचे आयोजन दि. १२ ते २० मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम उपक्रमांनी होत असून भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १२ ते शनिवार दि.२१ मे दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १९ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी मूर्तींची डिस्कळ ते पसूचा मळा या मार्गावर भव्य मिरवणूक आणि ग्राम प्रदक्षिणा होणार आहे. गुरुवार दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डिस्कळ ते गारवडी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. २० मे रोजी सकाळी ८.२१ ते ११.३० पर्यंत श्रींची प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक आदी धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. कलशारोहण प. पू. श्री बाळकृष्ण स्वामी महाराज, शिंदेवाडी फाटा, ललगुण, ता. खटाव यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.
या समारंभास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वगैरे विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक, भक्त उपस्थित राहणार आहेत.