‘या जन्मावर, या जगण्यावर..
शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे..’
अशाच या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावशाली जीवनावर पुन्हा पुन्हा कृतज्ञता वाहावी असे वाटतेय. आण्णा तुमचं असणे सर्वकाही होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे. आदर्श कुटुंबप्रमुख कै. श्री. विलास बाळासाहेब पवार (आण्णा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानिमित्त…
सोमवार, दिनांक २५/११/२०२४ रोजी आमच्या कुटुंबात एक दुर्दैवी घटना घडली. आमचे आजोबा श्री. विलास बाळासाहेब पवार यांचे दुःखद निधन झाले आणि अचानक आभाळ कोसळल्यासारखे झाले. ज्या आजोबांनी आम्हाला चांगले वाईट कसे ओळखायचे, प्रेम-नातेसंबंध कसे टिकवायचे, जपायचे व्यवहारी वृत्ती कशी असावी, कुठे शिस्त असावी, कष्टाची जाणीव, जीवनात उत्तम आहार, संस्कार आणि विचार कसे असावेत याचे ज्ञान दिले. ज्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा जपला. सर्वांना न्यायाने, नीतीने, विवेकाने कसे जगायचे हे शिकवले. सतत काम करण्याची जिद्द, स्वच्छतेचे महत्त्व ज्यांनी आम्हाला दिले, त्यांच्याबद्दल समजताच क्षणी पायाखालची जमीन सरकली व पोरके झाल्यासारखे वाटले. त्यांचा आधार, त्यांचे असणे व त्यांचा आशिर्वाद म्हणजे खूप मोठा अभिमान वाटायचा. क्षणभर सर्व हरपल्यासारखे वाटले, पण त्यांनी दिलेली संस्कारांची शिदोरी मात्र आयुष्यभर पुरेल एवढी आहे. फक्त पुरणारच नाही तर पिढ्यान्पिढ्या तो सर्वांना तृप्त करेल, हे नक्कीच!
कै. श्री. विलास बाळासाहेब पवार म्हणजेच आमचे ‘आण्णा’. गुरसाळे गावातील अतिशय समृद्ध आणि वैभवसंपन्न कुटुंबातील व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावातच विचारांची लाजवाब संपन्नता होती. वेळेचा काटेकोरपणा, स्वतःच्या जीवनातील त्यांची तत्व, शिस्तबद्धता, नीटनेटकेपणा, टापटीप, स्वच्छतेची आवड, थोरले असल्यामुळे लहानपणापासूनच जबाबदारीची जाणीव व त्यातूनच वैचारिक परिपक्वता व वस्तुनिष्ठता वाढीस लागली. कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता, त्याचा सखोल अभ्यास करणे, त्यातूनच विश्वासार्हता जपणे, समाजातील त्यांचा असणारा मान, लोकांशी बोलणे, वागणे, संपत्तीचा गर्व नाही, अतिशय निगर्वी वृत्ती, स्वच्छ नीतिमत्ता असणारे जीवनाकडे उदात्त दृष्टिकोनातून पाहणारे, दूरदृष्टी असणारे तसेच शेतीची प्रचंड आवड असणारे, राजकारणी लोकांपासून थोडे दूर राहणारे; परंतु वेळप्रसंगी त्यांनाही मार्गदर्शन करणारे अभ्यासू मार्गदर्शक, शिक्षणाची आवड असणारे, खूप सुशिक्षित व उच्च विचारसरणी असणारे, व्यसनी वृत्तीचा तिटकारा करणारे, चांगल्या लोकांची पारख व तसाच सहवास असणार्या लोकांशीच संबंध जोपासणारे, चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहणारे, ज्यामुळे त्यांच्या आसपास फक्त चांगल्याच लोकांचा संपर्क होता. चुकीच्या प्रवृत्तीची माणसे आपसूकच त्यांच्यापर्यंत जात नव्हती. हे त्यांच्यातील चांगल्या वृत्तीचे स्वभावाचे मोठे उदाहरण होय.
आण्णांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३७ रोजीचा. आण्णांना दोन भाऊ व चार बहिणी होत्या. त्यांच्या आई लवकर वारल्यामुळे त्यांना आईचे प्रेम कमी मिळाले; परंतु वडील त्या काळातील मेजर सुभेदार होते. अतिशय करारी वृत्तीचे तेवढेच मायाळूदेखील. त्यामुळे सर्वच भावंडांवर वडिलांनी खूप चांगले संस्कार केले व आई नसेल तरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, जेणेकरून मातृत्वाची उणीव वाटायला नको. आण्णा थोरले, भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे सर्वात अगोदर त्यांचेच लग्न झाले. त्यांना ‘चंद्रभागा’ नावाची सुंदर पत्नी लाभली. ती ही चंद्रासारखी शीतल स्वभावाची, खूप सहनशील, सर्वांना वात्सल्याच्या सावलीत ठेवणारी, खूप प्रेमळ, कष्टाळू आणि सतत कुटुंबासाठी कार्यरत असणारी! आण्णांनी स्वतच्या भावंडांची तर लग्नकार्ये पार पडलीच; परंतु स्वतःच्या मुलांसमवेत सर्व भावांच्या मुलांची, मुलींची शिक्षणे पूर्ण करून खूप घरंदाज कुटुंबाशी नाती जोडली व त्यांचेही लग्नसोहळे पार पाडले.उत्तम सोयरा पाहण्यात त्यांचा हातखंडा होता. निर्व्यसनी जावई व घरंदाज सुना त्यांनी आपल्या कुटुंबात आणल्या, त्यांची शिकवणच अशी की, शेती भरपूर असावी. शेती ही खूप मोठी संपत्ती आहे. स्वतः बागायतदार असल्यामुळे आपले नातलगदेखील संपन्न, समृद्ध बागायती शेती व चांगली इस्टेट असणारे प्रतिष्ठीत घरातीलच असावेत, असाच त्यांचा अट्टाहास असे. घरी आलेल्या पाहुण्यांचा, लोकांचा व्यवस्थित पाहुणचार केल्याशिवाय त्यांना लावायचे नाही. पैशाचा चुकीचा वापर केलेला त्यांना आवडत नसे. पैसा योग्यच ठिकाणी खर्च करायचा, विनाकारण, अवास्तव गोष्टींसाठी खर्च करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. हौस कशाची असावी व आवडी जपताना आपण विचारपूर्वक खर्च करणे, त्यांच्यातील काटकसरी वृत्ती, योग्य गुंतवणूक करण्याचा स्वभाव व उच्चप्रतीच्या वस्तूंचा वापर करण्याची आवड या त्यांच्या स्वभावातील वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या प्रतिष्ठेला जपताना त्यांनी कायम दिग्गज व चारित्र्यवान लोकांशी संबंध जोडले.
नातेपुते व पंचक्रोशीत आण्णांना खूप मान आहे. आण्णांचे नाव प्रत्येकजण आदराने घेतो. समाजात त्यांना मानणारा असा वेगळा लोकांचा जमाव आहे. बाजारपेठेत त्यांचा लौकीक आहे. सर्वच समाजबांधवांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःला घडवले आहे. कुटुंबप्रमुख कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे ‘आण्णा’. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा व पाच मुली आणि नातवंडे आहेत. त्यांच्या मुलांबरोबरच त्याची सून व जावईदेखील आण्णांवर तेवढेच प्रेम करीत. त्यांच्या कर्तबगार व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांच्या मुलांमुलींवरच काय पण त्यांची सर्व नातवंडेसुद्धा तेवढीच संस्कारसंपन्न आहेत.
त्यांचा मुलगा व माझे वडील श्री. विजय (दादा) पवार हे आतापर्यंत त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते. गुरसाळे गावात त्यांच्या या गुणांची खूप कदर व आदर केला जातो की, शेवटपर्यंत दादांनी वडिलांचे शब्द प्रमाण मानून स्वतःची कर्तव्ये पार पाडलीत. आण्णांच्या संस्कारांचा ठसा प्रत्येकाच्या मनावर आहे. जीवनाकडे पाहण्याचा वास्तव दृष्टिकोन त्यांनी सर्वांना दिला.
आण्णा ‘शिवामृत डेअरी’चे चेअरमन होते. श्री काळभैरवनाथ विद्यालयाचे संचालक होते. तसेच धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात ते सक्रिय असायचे. अतिशय प्रामाणिकपणे व इमानदारीने त्यांनी त्यांचे आयुष्य जगले. वयाच्या ८८ व्या वर्षीदेखील ते खूप तल्लख बुद्धीचे व व्यवस्थितपणे जीवन जगणारे होते. असे आमचे ‘आण्णा’ सहज बोलत बोलत आमच्यातून हरपले. आण्णांनी आम्हाला दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीचा आम्ही अखंड वारसा जपू व त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव कायम मनात तेवत ठेवू. अतिशय संयमी, स्वच्छ, शांत मनाच्या आण्णांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
– श्री. सिद्धीराज विजय पवार, गुरसाळे,
ता. माळशिरस, जि. सोलापूर