
स्थैर्य, दि. 22 – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबत येत्या 28 तारखेला आयसीसी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. करोनाचा धोका अद्याप संपलेला नसल्याने या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जगभरात करोनाचा संसर्ग वाढल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने सहा महिन्यांचा लॉकडाऊन लावला आहे. त्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर लगेच 18 ऑक्टोबरला टी-20 विश्वकरंडक स्पर्घेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व देशांच्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना तसेच सपोर्ट स्टाफला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. त्यानंतर ते स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अर्थात करोनामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला प्रचंड तोटा झालेला आहे. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर देशांतर्गत क्रिकेट देखील बंद असल्याने प्रायोजकांनीही पाठ फिरवली असल्याने दिवसेंदिवस हा तोटा वाढतच जाणार असून ही स्पर्धा आत्ता करोनाच्या सावटाखाली खेळवायची का पुढे ढकलायची याबाबत ही बैठक होणार आहे.
या स्पर्धेबाबत बैठक जरी बोलावण्यात आली असली तरी त्यात केवळ तिनच पर्याय समोर दिसत आहेत. एकतर ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा खेळवायची. दुसरे म्हणजे सहभागी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवून वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यावर प्रेक्षकांना प्रवेश नाकारून रिकाम्या मैदानावर स्पर्धा खेळवणे. किंवा तिसरा पर्याय म्हणजे 2022 साली ही स्पर्धा मुक्त वातावरणात आयोजित करायची. आता बैठकीत याबाबत काय निर्णय होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रीलंका दौरा होण्याची शक्यता…
करोनाच्या संकटामुळे विविध स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरीही भारतीय संघाचा आगामी श्रीलंका दौरा ठरल्यानुसारच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ पाठविण्याची बीसीसीआयने तयारी दर्शवली असून केंद्र सरकारने परवानगी दिली तर हा दौरा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होऊ शकतो, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 एकदिवसीय तसेच 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.