आता मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ११ : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटेल. यातच भाजप खासदार उदयनराजे भोसले  या मुद्द्यावरून अधिक आक्रमक झाले असून, आता मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते. सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेदपत्रिका काढावी, या मागणीचा पुनरुच्चार उदयनराजे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

सरकार काय करतंय, तेही कळू द्या

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केल नाही. म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. मराठा कुटुंबात मी जन्मलो म्हणून नाही तर वाटत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. अशामुळे मराठा मुले फस्ट्रेशनमध्ये येणार नाहीत का, असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.

नेत्यांना भेटून काहीही उपयोग झाला नाही

गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटी दिल्या. मराठा आरक्षण हाच मुख्य मुद्दा या भेटींमागील होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसल्याची खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या व्यक्ती न्यायालयात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. राज्य सरकारने श्वेतपत्रिका आणावी. जगात जात नसती तर भांडण झाले नसते. सगळे एकत्र राहिले असते. ते आता एकमेकांशी बोलत नाहीत. मी अनेक नेत्यांना भेटलो पण त्याचा उपयोग झाला नाही असे वाटते, अशी नाराजी उदयनराजे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. तसेच विधिमंडळातही भाजपने सरकारला घेरले. देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत, अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाशी काही घेणे-देणे नाही, असा दावा केला.


Back to top button
Don`t copy text!