
दैनिक स्थैर्य । दि. 22 जुन 2025 । सातारा । चारित्र्याचा सतत संशय घेणार्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रेयस अनिल कुमार पाटील वय 20 राहणार मेहर देशमुख कॉलनी, करंजे, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे
प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे वय 32 राहणार मंगळवार पेठ. मूळ राहणार पानमळेवाडी, पोस्ट वर्ये, ता. सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंजली राजेंद्र शिंदे वय 29 रा मंगळवार पेठ असे मयत पत्नीचे नाव आहे. मेव्हण्याशी धक्काबुक्की होऊन जखमी झालेल्या संशयिताला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी, संशयित आरोपी राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दिनांक 19 रोजी रात्री साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान नवरा बायको मध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. या भांडणाची कल्पना अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती. दिनांक 20 रोजी सकाळी त्यांचा मृतदेह घरातील कॉटच्या खाली कपड्याच्या गाठोड्याने झाकलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी फिर्यादी श्रेयस पाटील व राजेंद्र शिंदे यांच्यात धक्काबुक्की होऊन शिंदे जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सातारा परिसरात खळबळ उडाली आहे.