दैनिक स्थैर्य | दि. 12 जानेवारी 2024 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०९ जानेवारी २०२४ रोजी कृषि महाविद्यालय शेती विभागात ‘हुरडा पार्टी’आयोजित करण्यात आली.
पारंपारिक पध्दतीनुसार ज्वारीच्या कोवळ्या दाण्यापासून तयार करण्यात येणारा हुरडा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त समजला जातो. यामध्ये डायेटरी फायबर्स, प्रथिने वेगवेगळे मुल्यद्रव्य जसे की मॅग्नेशिअम, कॅल्शीयम पोटॉशियम फॉस्फरस व जीवनसत्व या पोषक घटकांचा एक उत्तम स्त्रोत म्हणजे हुरडा यालाच भारतामध्ये काही ठिकाणी ‘पॉक’ असेही म्हटले जाते.
आहारतज्ञाच्या मते यामध्ये आढळून येणाऱ्या Antioxidant आणि phytochemicals यामुळे हृदय विकार, डायबिटिस, कॅन्सर, पचन क्रियेविषयीच वेगवेगळया समस्या यावर हुरडा अंत्यत गुणकारी समजला जातो. तसेच वजन नियंत्रणा मध्येही याचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्वारीच्या कोवळया दाण्यांना भाजून तयार करण्यात आलेला अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी हुरडयाचे सेवन प्रामुख्याने हिवाळयात केले जाते.
कृषि महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन सातारा जिल्हा कृषि अधिक्षक भारती फरांदे, सातारा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कॉन्सीलचे पदाधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निबांळकर, शेती फार्मचे राजेंद्र पवार, प्रा. सांळुखे एस. एम. यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहुन आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि लाभदायी ‘हुरडा पार्टीचा’ आस्वाद घेतला.
शेतकरी बांधवानी अशा पारंपारीक हुरडा पार्टीचे आयोजन केल्यास त्यांना अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध होवु शकते तसेच याला अॅगो टुरीझम क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हुरडा ज्वारीची लागवड केल्यास २० ते २५ क्विटल / हेक्टर हिरवा हुरडा मिळु शकतो हुरडा ९५ ते १०५ दिवसात काढणीस तयार होतो प्रती / हेक्टरी रु ८०००/- इतका खर्च येतो आणि त्यापासून ४००००/- रु इतका निव्वळ नफा मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवानी हुरडा ज्वारीची लागवड व्यापारी तत्वावर करावी म्हणजे या व्यवसायापासुन अधिक प्रमाणात आर्थिक फायदा होवु शकतो.