शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चिंचणेर निंब येथे अंत्यसंस्कार


 

स्थैर्य, सातारा, दि.२३ : वीर जवान अमर रहे, भारत
माता की जय अशा घोषणांनी आज (बुधवार) सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब
येथील वातावरण भरुन गेले होते. सिक्किम येथे रस्ता अपघातात हुतात्मा झालेल
जवान सुजित किर्दत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून आलेल्या
शेकडो नागरिकांनी चिंचणेर निंब येथील कृष्णा तीर भरून गेला होता.
देशभक्तीने भारलेल्या वातावरणात हुतात्मा “सुजित किर्दत’ यांना अखेरचा
निरोप देण्यासाठी शेकडाे युवक जमले हाेते.

चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवाची ग्रामस्थ,
नातेवाईक तसेच पंचक्रोशीतील नागरीक वाट पहात होते. आज (बुधवार) दुपारी
त्यांचे पार्थीव चिचंणेर निंब येथे आणण्यात आले. हुतात्मा किर्दत यांच्या
अंत्यसंस्काराची कृष्णेच्या तीरावर व्यवस्था केली होती. पार्थिव येताच
त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समस्त नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातच
त्यांच्या कुटुंबियांनी पार्थिव पाहताच केलेला आक्रोश सर्वांचे हृदय
पिळवटून टाकत होता.

फुलांनी सजविलेल्या वाहनात लष्करी जवानांनी पार्थिव ठेवले. चिचणेर निंबमधून
निघालेल्या या अंत्ययात्रेत नागरिक मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. अगदी
शिस्तीत अंत्ययात्रा कृष्णा तीरी चालली होती. वाटेत नागरिक पार्थिवावर
फुलांची उधळण करत होते. समस्त युवा वर्ग हुतात्मा जवान सुजित किर्दत अमर
रहेच्या घोषणा अखंडपणे देत होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!