फलटण तालुक्यात हुमणी अळी नियंत्रण अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । फलटण । अलीकडच्या काळात शाश्वत पाणी पुरवठ्याच्या जमिनीत ओलावा आणि अर्धवट कुजलेल्या शेणखत व कंपोष्ट खताचा वापर जास्त होत असल्याने विशेषत्वाने ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. याच अनुषंगाने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली  फलटण तालुक्यात हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी गतवर्षी प्रमाणे हुमणी अळी नियंत्रण अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात येत आहे.

कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय,फलटण सहकारी साखर कारखाने, विकास सोसायटी, शेतकरी स्वयंसहायता समुह तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांचा सहभाग आणि सहकार्य घेतले जात आहे. हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनी बाहेर असते.बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे असते. या साठी कृषि विभागाने एप्रिल महिन्यापासूनच मोहिमेला सुरुवात केली आहे, कारण वळवाचा किंवा मानसूनचा पहीला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ,बोर, कडू लिंब या झाडावर पाने खाण्यासाठी गोळा होतात.अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या साह्याने हलवून खाली पडलेले प्रौढ भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारणे, अशा झाडांवर शक्य असल्यास किटकनाषकाची फवारणी करणे.तसेच मोठ्या प्रमाणावर भूंगेर्ऱ्याना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे,एरंड बियांचे आंबवण सापळे बसविणे, उन्हाळी उभी आडवी नांगरट करणे व जमिन तापू देणे, निंबोळी पेंडचा वापर प्रति एकरी दोन टन, शेणखतातील हुमणी अळीचे नियंत्रण, सापळा पिकांचा वापर उदा. एरंड मका झेंडू आणि चवळी, पक्षी थांबे बसविणे, मोकाट पद्तीने पाणी देणे, मेटारायझीयम अँनिसोपली या जैविक बुरशीचा चार किलो ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे शेणखत अगर सेंद्रिय खतात मिळसून वापर इत्यादी उपाययोजना शेतकर्यांच्या  सहभागातून सामुदायिकरित्या करण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होणार आहे. यामुळे हुमणी अळीचा पुढील कालावधीत दिसणारा प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. हुमणी ही बहुभक्षी किड असून ती आगामी हंगामात घेण्यात येणाऱ्या ऊस, सोयाबीन,भुईमुग गहू हरभरा इत्यादी पिकांवर उपजिवीका करू शकते त्यामुळे शेतकरी बंधुंनी पुढील नुकसान टाळण्यासाठी शक्य होईल तितक्या लवकर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घ्यावा तसेच अधिक माहिती साठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडल कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!