मराठा क्रांती मोर्चाच्या फलटण शहर व गावागावात बैठका; तरुणांचा मोठा सहभाग
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाला अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे शनिवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी येण्याचे आवाहन केले असून त्यासाठी फलटणमधून हजारो मराठा बांधव निघाले आहेत, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ५० ट्रक-टेंपो, १०० बसेस व २०० कार व ३०० मोटारसायकल जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समन्वयकांनी सांगितले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते, यानंतर राज्य सरकारने तीस दिवस मुदत मागितली होती, ती वाढवून मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवस केली आहे, त्या अनुषंगाने शनिवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी, जालना येथे सभा आयोजित केली आहे. या सभेला मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होण्यासाठी फलटण शहर व गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. या सभेला कमीतकमी पाच हजार युवकांची फौज जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या अनुषंगाने काही सूचना मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समनव्यकांनी केल्या आहेत. येणार्या १४ तारखेला कमीत कमी लवकर पहाटे आपापल्या गावातून कमीतकमी ३ ते ४ वाजता निघावे लागेल, तरच आपल्याला अंतरवली, सराटे गाव सभास्थळी जाता येईल, असे सांगितले आहे. सर्वांनी जाण्यासाठी आपापल्या शेजारच्याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक गाडीला ड्रायव्हरच्या डाव्या साईडला मध्यम भगवा झेंडा लावावा. आपल्या घरून जाताना प्रत्येकाने दोन वेळेचा किंवा दोन व्यक्तींचा जेवणाचा डबा सोबत घ्यायचा आहे, व आपापल्या गाडीमध्ये पाण्याचे जार किंवा पाणी बॉटल ठेवाव्यात, आपल्याला आपल्या बरोबर आपल्याच मराठ्यांची काळजी घ्यायची आहे, कारण खूप मोठा मराठ्यांचा झंझावात तेथे असणार आहे.
या मराठ्यांच्या सभेची जगात ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होणार आहे, त्याअनुषंगाने जालना येथे इंग्लंडचे शास्त्रज्ञ येत आहेत, असा संदेश मिळाला आहे. त्यामुळे लवकर निघून वेळेवर पोहोचा, घाई गडबड करू नये, कारण मुंग्यांच्या लाईनपेक्षा वाहनांची लाईन मोठी राहणार आहे. पुरूष मंडळी यांनी आपल्या आयाबहिणींची मदत करायची आहे, जातीवंत मराठा मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा समाजाच्या लेकरांसाठी एवढे सगळे बलिदान देत आहेत, हा माणूस शासनाच्या व आमदार खासदाराच्या आमिषाला बळी न पडता सकल मराठा समाजाच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आपली आहुती देत आहे, त्यांच्या पत्नी व मूलाबाळांचा संसार उघड्यावर करून समाजासाठी रक्ताचे पाणी करीत आहेत, आपण त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त एकच दिवस महासभेसाठी जायचे आहे, असे मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने समाज बांधवांना आवाहन करण्यात आले आहे.
जाण्यासाठी योग्य व चांगला मार्ग पुढीलप्रमाणे…
- गुगल मॅप…
- जे मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यांनी खालील मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा – ९९६००४३७३३,९८५०८८००९९,९४२१२१३६५६,९८२२४३०६८२,७७५६९१७७७७
मराठ्यांची विराट सभा… मी साक्षीदार होणार, तुम्हीही व्हा – मराठा क्रांती मोर्चा फलटण
१४ आक्टोंबर २०२३ अंतरवाली सराटी सूचना विनंती…
जाहीर सभेला जातांना घेण्याची काळजी
- सभेला जाताना पूर्ण एक दिवसाचे नियोजन करावे, सभेमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्याचे फोटो किंवा शुटींग करुन घ्यावी व इतर समन्वयकांना कळवावे.
- सभेच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी काही लोक आरडाओरड करण्याची शक्यता असल्यामुळे कोणीही घाबरून जावू नये व पळापळी किंवा लोटालोटी होणार नाही याची काळजी घ्यावी, आपण ज्या ठिकाणी असाला त्याच ठिकाणी थांबणे व अफवांवर लक्ष ठेवू नये.
- आपण आपल्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करा. या दिवशी कोणीही घाई गडबड करु नये, सावकाश या व सुखरूप पोहोचा, सभेल्या जाणार्या वाहनामध्ये एक दिवस अगोदार पेट्रोल, डिझेल, इंधन भरून घ्यावे. सभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माता-भगिनी असल्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. सभेमध्ये गोंधळ होवू नये म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सभा ऐकण्यास भेटो अथवा नाही भेटो; परंतु त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करून इतिहासाचे साक्षीदार व्हावे, असे मराठा क्रांती मोर्चा फलटणने आवाहन केले आहे.