
इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा २०२६ साठी फलटणमधील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे बैठक व्यवस्था जाहीर. १० फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान परीक्षा.
स्थैर्य, फलटण, दि. १० फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने आयोजित इयत्ता १२ वी (HSC) बोर्ड परीक्षा फेब्रुवारी–मार्च २०२६ साठी फलटण शहरातील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, केंद्र क्रमांक ०१०२ येथे कला शाखेच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
या केंद्रावर दि. १०/०२/२०२६ ते ११/०३/२०२६ या कालावधीत परीक्षा होणार असून, परीक्षा क्रमांक X070558 ते X070952 तसेच X400054 या क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर एकूण ३९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थी व पालकांनी या बैठकीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षार्थींनी संबंधित परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार प्रवेशपत्र (हॉल तिकीट), ओळखपत्र व आवश्यक लेखन साहित्य घेऊन परीक्षा वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी, मोबाईल, टॅब्लेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, पॉकेट कॅल्क्युलेटर तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त आणि शांत वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्र संचालक सौ. कदम मॅडम, उपकेंद्र संचालक श्री. दिवसे सर, श्री. खरात सर तसेच प्राचार्य श्री. काळे बालकृष्ण दादा यांनी केले आहे.
