स्थैर्य, मुंबई, दि.२४: राज्य सरकारमध्ये सचिन वाजे यांच्यासारखे किती अधिकारी दडले आहेत असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी उपस्थित केला.परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार करून घेण्याचे दिलेले निर्देश अत्यंत महत्वाचे असून देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो , असेही श्री . भांडारी यांनी नमूद केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.भांडारी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. श्री. भांडारी म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती सचिन वाजे प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळया कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे , अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाजेंकरवी जी कामे करून घेतली जात होती , ती कामे करून घ्या , अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. वाजेंसारखे किती अधिकारी सरकारमध्ये दडले आहेत हे कळले पाहिजे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणामुळे ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करा , असे निर्देश दिले आहेत . मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत , असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्याचबरोबर देशमुख यांनाही या याचिकेत पक्षकार करून घ्या असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे . तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असेही श्री . भांडारी यांनी नमूद केले.