स्थैर्य, ढेबेवाडी (जि. सातारा), दि.२३ : गावच्या मार्गावर धावणारी एकमेव
एसटी बस बंद ठेवल्याने ढेबेवाडी खोऱ्यातील दुर्गम निवी, कसणीसह त्या
परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांतील सुमारे ऐंशीहून अधिक विद्यार्थी शाळा
सुरू होऊनही तीन आठवड्यांपासून घरातच बसून आहेत. या गावांमध्ये मोबाईल
नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणावर मर्यादा असतानाच सुरू असलेली ही गैरसोय
प्रचंड शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे.
दुर्गम मत्रेवाडी, जाधववाडी, निवी, कसणी, निगडे, घोटील, म्हाइंगडेवाडीसह
परिसरातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांतील विद्यार्थ्यांना माध्यमिक व
महाविद्यालयीन शिक्षणासाठी मेंढ, ढेबेवाडी, तळमावले, कऱ्हाड येथे जावे
लागते. दूरच्या अंतरामुळे एसटी प्रवासाचा सवलतीचा पास काढून विद्यार्थी ये-
जा करतात. त्या मार्गावर ढेबेवाडी- निगडे ही कऱ्हाड आगाराची एकमेव बस
धावते. सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या तीन फेऱ्या होतात. लॉकडाउनमध्ये बंद
ठेवलेली बससेवा अलीकडे काही दिवस सुरू करून पुन्हा बंद केल्याने ऐंशीहून
अधिक विद्यार्थी तीन आठवड्यांपासून अन्य गावातील शाळेत न जाता घरातच बसून
आहेत.