स्थैर्य,मुंबई, दि.२२: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या मुद्द्यावरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
राज्यात कोरोनाचे असे कुठले आकडे वाढले आहेत, हा प्रश्न आहे. कृपया जनतेला भीती घालू नका. विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नसेल तर नका घेऊ. अध्यक्षांची निवड करायची नसेल तर नका करू. पण लोकांना भीती कशाला घालताय, असा सवाल देशपांडे यांनी विचारला. तसेच सध्या राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना कोरोना कसा काय होतोय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
तिकडे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र तिकडे कोरोना नाही आहे. अमरावतीत कोरोनाच्या जास्त टेस्ट घ्यायच्या आणि कोरोना वाढल्याचे सांगायचे. गेल्या चार महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन झालं तेव्हा कोरोना पसरला नाही. बसमध्ये चेंगरून लोक प्रवास करताहेत, तेव्हा कोरोना कसा काय नाही झाला. अधिवेशनाच्याच काळात कोरोनाचा फैलाव होतो आहे, अशी शंका देशपांडे यांनी उपस्थित केली.
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला दिली होती.