दैनिक स्थैर्य | दि. ४ फेब्रुवारी २०२५ | मुंबई |
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात ७६ लाख मतदान वाढले. त्यावर आक्षेप घेतलेल्या पराभूत उमेदवारांच्या याचिकांवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सायंकाळी ६ वाजेनंतर इतके मतदान कसे वाढले? अशी विचारणा करून त्याबाबत व्हिडिओ फुटेजसह २ आठवड्यात खुलासा सादर करा, अशी नोटीस केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकार्यांना बजावली आहेे. सरकारी पक्षाकडून मात्र कोणताही युक्तिवाद करण्यात आला नाही.
न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने संध्याकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचे निवडणूक आयोगाने शूटिंग केले आहे का? केले असल्यास त्याचे व्हिडिओ द्यावेत. आरटीआयमध्ये निवडणूक आयोगाकडे ही मागणी करण्यात आली होती. पण आयोगाने ती दिली नाही. इतकेच नव्हे तर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत झालेल्या ७६ लाख मताचा डाटा अर्थात प्री नंबर स्लीप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाढलेल्या ७६ लाख मतांचा हिशेब नाही का, असा सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
रांगेत उभ्या मतदारांना टोकन दिले का?- अॅड. आंबेडकर
संध्याकाळी सहा वाजेनंतर मतदान कसे घ्यायचे यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्या वेळी जेवढी माणसे रांगेत उभी आहेत त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचे टोकन द्यायचे आणि पहिल्या नंबरवर असलेल्या माणसाला प्रोग्रेसिव्ह नंबर देण्यात यावेत अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ती पद्धत आयोगाने लागू केली की नाही हे तपासण्यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागितली होती. पण निवडणूक आयोगाने माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले असे आंबेडकर म्हणाले.
पोल अन् काउंटर व्होट्सची जुळवणी झाली का?
निवडणूक आयोगाने किती स्लिप्स वाटल्या आणि किती वाटल्या नाहीत त्याची माहिती कोर्टाला द्यावी. निवडणुकीचा निकाल जाहीर करताना पोल व्होट्स आणि काउंटर व्होट्स यांची जुळवणी केली का? झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसरकडून तो सगळा डेटा निवडणूक आयोगाकडे पाठवणे अपेक्षित होते. आणि आयोग ज्या सूचना देतील त्यानुसार निकाल देणे अपेक्षित होते, तसे झाले आहे का? असे प्रश्न आंबेडकरांनी विचारले.
उत्पादनप्रणाली मजबूत असती तर परराष्ट्रमंत्र्यांना अमेरिकेला साकडे घालावे लागले नसते : राहुल
राहुल म्हणाले, देशाची उत्पादननिर्मिती प्रणाली मजबूत असती तर परराष्ट्रमंत्र्यांना ३-४ वेळा अमेरिकेला जाऊन आमच्या पंतप्रधानांना शपथविधी सोहळ्यास बोलवा, असे साकडे घालावे लागले नसते. त्यांनी स्वत:च इथे येऊन निमंत्रण दिले असते. यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राहुल गांधी डिसेंबर २०२४ मधील माझ्या अमेरिका दौर्याबद्दल जाणूनबुजून खोटे बोलले आहेत. मी बायडेन सरकारचे राज्य सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारास भेटण्यासाठी गेलो होतो. पंतप्रधानांच्या निमंत्रणाविषयी कोणत्याही पातळीवर चर्चा झालेली नाही. राहुल गांधी यांच्या खोटारडेपणाचा उद्देश राजकीय असू शकेल, पण त्यामुळे परदेशात भारताच्या प्रतिमेला तडा जातो. यावर राहुल उपहासाने ‘सॉरी’ म्हणाले.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवळी बोलताना ते म्हणाले, लोकसभेच्या तुलनेत विधासनभा निवडणुकीत महाराष्ट्रात सुमारे ७० लाख नवे मतदार अचानक उगवले. ही संख्या हिमाचलच्या लोकसंख्येएवढी आहे. महाराष्ट्रात ५ वर्षांत नव्या मतदारांची नोंदणी झाली त्यापेक्षा जास्त ५ महिन्यांत झाली. शिर्डीच्या एकाच इमारतीत ७ हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली. आम्ही आरोप करीत नाही, परंतु निवडणूक आयोगाने केवळ आम्हाला लोकसभा व विधानसभेतील मतदारांची यादी द्यावी. त्यांचे नाव-पत्ते आणि इलेक्ट्रिक पावती उपलब्ध करुन द्यावी. गंमतीचा भाग असा की,जिथे नव्या मतदारांची नोंदणी झाली त्या जागांवर भाजप जिंकला आहे,याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
युपीए-एनडीए दोन्ही सरकार अपयशी
बेरोजगारीची समस्या हटवण्यात पूर्वीचे यूपीए सरकार असो वा एनडीए सरकार दोघेही अपयशी ठरले आहेत. देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असून आपल्याला त्यादृष्टीने काम करावे लागेल. राहुल यांनी केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमावरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही चांगली कल्पना होती परंतु त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे. २०१४ मध्ये आपल्या विकास दरात निर्मिती-उत्पादन क्षेत्राचा वाटा १५.३% होता तो आता घटून १२.६% वर आला आहे. गेल्या ६० वर्षांतील हा नीच्चांक आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल म्हणाले, ते लक्षपूर्वक ऐकणे अवघड होते. असे घडावयास नको होते.