दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जे नागरिक पालन करीत नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
कोविड -19 प्रादुर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधन सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.