
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी सामाईक कृषी प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकामध्ये मोठी भर पडली आहे.
महाविद्यालयातून जून २०२५ मध्ये पदवी पूर्ण केलेल्या कार्तिक किशोर कदम या विद्यार्थ्याने एम.एस.सी. कृषी प्रवेशासाठी राज्यातून ११ वी, तर एम.एस.सी. उद्यानविद्या शाखेसाठी राज्यातून १३ वी रँक मिळवली आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याने भारतीय कृषी अनुसंधान केंद्राच्या (ICAR) राष्ट्रीय परीक्षेत कृषी जैवतंत्रज्ञान विषयात EWS प्रवर्गातून राष्ट्रीय स्तरावर १० वी रँक प्राप्त केली आहे.
याचबरोबर, विजय आनंदा झगडे याने ‘ICAR’ परीक्षेत वनस्पतीशास्त्र विषयात OBC प्रवर्गातून राष्ट्रीय स्तरावर ४७८ वी रँक, तर कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अमन सकपाळ याने कृषी कीटकशास्त्र विषयात राष्ट्रीय स्तरावर ६० वी रँक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराje नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

