दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । खटाव । पुसेगाव ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा 28 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. 1 जानेवारी 2022 हा यात्रेचा मुख्य दिवस असून श्री सेवागिरी महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकांची मिरवणूक काढली जाते.
मिरवणुक मार्गावर पुसेगाव व परिसरातील अनेक घोडे सहभागी होत असतात. यावेळी घोड्यांचे मालक गर्दीमध्येच घोड्यांच्या कसरतील दाखविणे, घोड्यांना नृत्य करावयास लावता वेळी प्रसंगी घोड्याला चाबकाने अमानुषपणे मारहाण करणे त्यामुळे नाचणारे घोडे बिथरलेस ते यात्रा उधळून लावण्याची व त्यातून लोकांची चेंगराचेंगरी होवून त्यामध्ये जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही व अशा प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार 1 जानेवारी 2022 रोजी 00.00 ते 1 जानेवारी रोजीच्या 24 वाजेपर्यंत मौजे पुसेगाव व रथोत्सव मिरवणूक मार्गावर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या घोड्यांना मनाई आदेश जारी केले आहे.