दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । संगमनेर । शिक्षण क्षेत्रातील नव्या सुधारणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कूलने या क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे. या प्रयत्नांची दखल घेत द अकॅडमी स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांचा नुकताच गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या महिलांना दिला जाणारा वुमन अचिवर्स पुरस्कार यंदा शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. तांबे यांना जाहीर झाला.
मुंबईतील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी युनायटेट फॉस्फरस लिमिटेडचे अध्यक्ष पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिरानंदानी ग्रुपचे कार्यकारी संचालक निरंजन हिरानंदानी, एचडीएफसी म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत आणि एल ॲंड टी फायनान्स होल्डिंगचे अध्यक्ष शैलेश हरिभक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
द अकॅडमी स्कूलची स्थापना अवघ्या ५ वर्षांपूर्वी पुण्यामध्ये ग्रामोदय ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. या शाळेने अल्पावधीतच पुण्यात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणणारी ही राज्यातील पहीली शाळा ठरली आहे. याच बरोबर जगातील सर्वोत्तम शालेय शिक्षण पध्दतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फिनलॅंड या देशाशी करार करुन द ॲकेडमी स्कूल ने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही पध्दती अंमलवली आहे. या सर्व नवनवीन प्रयोगांमुळे द ॲकेडमी स्कूलला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शाळेचा परिसर हा खूपच निसर्गरम्य बनवण्यात आला असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळा ही एक आनंददायी जागा बनली आहे. द ॲकेडमी स्कूलचे आणखी एक वैशिष्टये म्हणजे येथे काम करणाऱ्या स्टाफ मध्ये ९५ % महिला आहेत. विशेष म्हणजे शाळेने फीच्या बाबतीतही अतिशय चांगले धोरण ठेवले आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या शालेय शिक्षणावर किती खर्च येईल याची पूर्ण पारदर्शक माहिती दिली जाते, ज्यामुळे पालकांना आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. गेल्याच वर्षी शाळेची दहावीची पहिली बॅच १०० % निकालाने बाहेर पडली. संस्थेच्या या दैदिप्यमान वाटचालीत डॉ. मैथिली तांबे यांचे योगदान मोठं आहे.
दंतशल्यक विषयात पदवीधर असलेल्या डॉ. तांबे यांनी पुढे शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्याचा मार्ग निवडला. माहिती संकलित करण्याचं माध्यम एवढीच शिक्षणाची व्याप्ती नसते. शिक्षणामुळे व्यक्तीची आणि पर्यायाने समाजाची उन्नती होते, अशा विचाराने त्या शिक्षण क्षेत्रात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या दुर्मिळ कलागुणांची जोपासना करून ते वाढीस लावण्याच्या उद्देशाने आपण भारल्या गेल्या आहोत, असं त्या नेहमीच म्हणतात. त्याबरोबर शाळा चालवणे हा व्यवसाय नसून मानव विकासाचे एक पवित्र कार्य आहे, द ॲकेडमी स्कूलचे ब्रीदवाक्यच “ हॅप्पी ॲट स्कूल” म्हणजेच “शाळेत आनंद” असा आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक गोष्ट आम्ही आनंद देणारी असावी याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देत असतो, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. मैथिली तांबे यांच्याशिवाय आदित्य बिर्ला एज्युकेशनल ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्ष नीरजा बिर्ला, कायनॅटिक ग्रुपच्या सुलज्जा फिरोदिया, मुंबईच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पद्मश्री डॉ. सोमा घोष यांनाही हा वुमन अचिव्हर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारबद्दल डॉ. मैथिली तांबे यांचे ग्रामोदय ट्रस्ट संस्थेचे मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.