दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण | आपला भारत देश विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये आत्मसन्मानाने आग्रभागी उभा असला पाहिजे या पद्धतीने देशातील सर्वांगीण विकासाचा एक आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना संपूर्ण आराखडा आणि मोदीजींच्या संकल्पनांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लाभणारी साथ अभिमानास्पद असून मोदी@९ अभियानातील विकास तीर्थ म्हणजे काय याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.
फलटण – लोणंद रेल्वे प्रवासाद्वारे रेल्वे वाहतूक सुरु असल्याचे स्पष्ट
माढा लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांना भेटी व लाभार्थ्यांशी चर्चा या उपक्रमांतर्गत लोणंद – फलटण – बारामती रेल्वे मार्गापैकी पूर्णत्वास गेलेल्या फलटण – लोणंद व पुढे पुणे रेल्वे मार्गावरुन फलटण – लोणंद प्रवासात पत्रकारांशी खा. अमर साबळे बोलत होते, यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा अन्य पदाधिकारी, नागरिक रेल्वेने प्रवास करीत होते.
विकास प्रक्रिया गतिमान ठेवण्यात खासदार यशस्वी
केंद्रातून निर्माण झालेली विकासाची गंगा माढा व सातारा लोकसभा मतदार संघात पोहोचली असून झालेल्या विकास कामामुळे या दोन्ही मतदार संघातील सर्वसामान्य माणूस समाधानी असल्याचे आपण पाहिले असल्याचे सांगताना आजच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यात वेळे गावाजवळील खंबाटकी घाटातील सुरु असलेल्या बोगद्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन आलो, त्यावेळी या दोन्ही मार्गांपैकी एक मार्गिका आगामी डिसेंबर मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले याचा अर्थ सर्वदूर विकास प्रक्रिया गतिमान ठेवण्यात येथील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे माजी खासदार अमर साबळे यांनी निदर्शनास आणून दिले.
आता संपूर्ण रुपया विकासासाठी खर्च
तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी केंद्रातून विकास कामांसाठी दिलेल्या १ रुपया पैकी ८५ पैसे मध्येच संपतात आणि प्रत्यक्ष विकास कामासाठी केवळ १५ पैसे उपलब्ध होत असल्याचे त्यावेळी सांगितल्याचे निदर्शनास आणून देत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनामुळे केंद्रातून विविध विकास योजनांसाठी दिलेला संपूर्ण १ रुपया तेथपर्यंत पोहोचून विकास प्रक्रिया गतिमान होत असल्याने या देशाची भरभराट सुरु आहे. गोरगरिबांना त्याचा लाभ होत असल्याने सर्व समाज घटकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे माजी खासदार अमर साबळे यांनी निदर्शनास आणून दिले.
पंतप्रधान मोदींच्या बदनामीचा कट उधळून लावणार
८५ पैशांचे दलालित अडकलेले विपक्षांचे नेते आणि काँग्रेस पक्ष त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलत आहेत, त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचत आहेत, त्याला छेद देवून वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मोदी@९ हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता खा. अमर साबळे यांनी स्पष्टपणे नमूद केली.
कार्यकुशल लोकप्रतिनिधी मुळे विकास प्रक्रिया गतिमान
मोदी@९ हे अभियान देशभर दि. ३० मे ते दि. ३० जून या कालावधीत राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गेल्या १४ वर्षात केंद्र व राज्य शासनाने राबविलेले लोकहिताच्या विविध १४ विषयांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी विकास तीर्थ हा एक विषय आहे, या मतदार संघात लोकविकासाचे जे प्रकल्प राबविण्यात आले, त्यापैकी २३ वर्षे रखडलेला लोणंद – फलटण – बारामती हा रेल्वे प्रकल्प असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाभिमुख नेतृत्व आणि कार्यकुशल लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कर्तृत्व संपन्न नेतृत्वामुळे काय आणि कसा विकास होऊ शकतो हे २३ वर्षे प्रलंबीत रेल्वे मार्गावरुन प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरु झाल्याने दिसून आल्याचे खा. अमर साबळे यांनी स्पष्ट केले. फलटण – लोणंद – पुणे मार्गावर प्रत्यक्ष वाहतूक सुरु झाली तर फलटण – बारामती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनानंतर आता प्रत्यक्ष रेल्वे मार्ग उभारणीच्या निविदा निघाल्या असून लवकरच ते काम सुरु होऊन लवकरच रेल्वे मार्ग पूर्ण होऊन वाहतूक सुरु होईल तर स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वेक्षण व भूसंपादन झालेल्या फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम ही लवकरच पूर्णत्वास जाईल याची ग्वाही खा. अमर साबळे यांनी दिली.