नीरा – देवघरच्या कालव्याचे बंद पडलेले काम आठवड्यात सुरु करणार : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण | फलटण हा कायम दुष्काळी तालुका असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे गेली ५० वर्षे पाण्याच्या प्रश्नावर राजकारण केले गेले, कधी देवघर, कधी नातंबी, कधी धोम – बलकवडी आणि नीरा – देवघर वगैरे अनेक प्रकारची अमिषे दाखवून या तालुक्याला झुलवत ठेवण्यात आल्याचा आरोप करीत आता मात्र नीरा – देवघर प्रकल्पातील कालव्याचे बंद पडलेले काम या आठवड्यात सुरु करुन लवकरच संपूर्ण तालुका १०० % बागायत करणार असल्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात केलेले काम, घेतलेले निर्णय, राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजना आणि शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण वर्ग, सर्वसामान्यांना मिळालेला प्रत्यक्ष लाभ याचा मोदी@९ महाजनसंपर्क अभियानांतर्गत आढावा घेण्यासाठी फलटण शहर व तालुका भाजपाच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीनंतर फलटण – पुणे रेल्वेने लोणंद पर्यंत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, पत्रकार यांच्यासह पोहोचल्यानंतर तेथून वघोशी, ता. खंडाळा येथे बंद पडलेल्या नीरा – देवघर प्रकल्पातील कालव्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उपस्थितांना माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

शेतकऱ्यांचे भंगलेले स्वप्न आता पूर्णत्वास जाणार

फलटण तालुका १०० % बागायत होणार हे सर्वसामान्य जनता विशेषतः कायम दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे भंगलेले स्वप्न लवकरच पूर्णत्वास जात असून नीरा – देवघर प्रकल्पाच्या अपूर्ण कालव्याच्या कामांना राज्य सरकारने नव्याने मान्यता देवून भरीव आर्थिक तरतूद केली आहे. आगामी सप्ताहामध्ये या कामाच्या निविदा निघतील आणि त्यानंतर राज्याचे उप मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी लाभ क्षेत्रात पोहोचविण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलविनार

भारतीय जनता पक्षाच्या मोदी@९ अभियानांतर्गत खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील लक्षावधी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत कृष्णेचे पाणी पोहोचविण्याचे अभिवचन देत त्याची पूर्तता करण्याचा निर्धार आपण केला असून त्यासाठी नीरा – देवघर सह अन्य योजनांची पूर्तता आणि ४ माही धोम – बलकवडी प्रकल्प १२ माही करण्याची घोषणा करीत लवकरच कृष्णेचे पाणी लाभ क्षेत्रात पोहोचणार असून शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलणार असल्याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली आहे.

खेड उपसा सिंचन योजना ही पूर्ण करणार

वाघोशी पर्यंत पाणी पोहोचले असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ या संपूर्ण भागाला अद्याप झाला नसल्याचे निदर्शनास आणून देत प्रस्तावित खेड उपसा सिंचन योजना पूर्ण करुन या संपूर्ण भागाला लाभ मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली, त्यावेळी कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही, आणि लाभ क्षेत्र पाण्यापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

कायम दुष्काळी पट्टा आता नक्की बागायती होणार

नीरा – देवघर प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन गेली २०/२२ वर्षे हे धरण पूर्ण क्षमतेने भरत असूनही कालव्यांची कामे अपूर्ण ठेवून लाभ क्षेत्रातील हजारो एकर क्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवून आपला स्वार्थ आणि मंत्रिपदासाठी इथल्या सत्ताधाऱ्यांनी हे पाणी कायम दुष्काळी भागाऐवजी बारामतीला दिल्याचा आरोप करीत आता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संपूर्ण ताकद दिली असून नीरा – देवघरच्या कालव्यासह नियोजित उपसा सिंचन योजना पूर्ण करुन संपूर्ण कायम दुष्काळी पट्टा बागायती करण्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यात आता कसलीही अडचण राहिली नसल्याचे नरसिंह निकम यांनी स्पष्ट केले.

केंद्र व राज्यातील मंत्र्यांशी थेट संबंध आणि बुद्धीकौशल्य उपयोगी आले

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत, रेल्वे मंत्री अश्विन कुमार वगैरे अनेक केंद्रीय मंत्री यांच्याशी असलेले थेट संबंध आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे निवडून येऊन ४ वर्षे झाली तरी कोरोना कालावधी वगळता उर्वरित केवळ २ वर्षांच्या कालावधीतही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या सबंधाचा फायदा घेऊन, बुध्दीकौशल्याने केवळ पाटबंधारे नव्हे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक वसाहत आणि विकासाची अनेक कामे पूर्णत्वास नेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला असल्याचे अड. नरसिंह निकम यांनी निदर्शनास आणून देत फलटण तालुका संघर्ष समितीच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघ भाजपा प्रमख सचिन कांबळे पाटील यांची समयोचीत भाषणे झाली. स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उषा राऊत, राहुल शहा, अमित रणवरे, रियाज इनामदार यांच्यासह भाजप पदाधिकारी, पत्रकार फलटण ते लोणंद रेल्वे प्रवास आणि वाघोषी प्रकल्पस्थळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!