वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । मुंबई । सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्काराबाबतची माहिती देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवार दि. २३ रोजी सायं. ४ वा.  होणार आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. आरोग्य सेवा प्रभावीपणे देणे, आरोग्य उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या उद्देशाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.

पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे

स्वयंसेवी संस्था हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर, उस्मानाबाद.

उत्कृष्ठ काम करणारे डॉक्टर डॉ. प्रमोद पोतदार, शरीर विकृती शास्त्र, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती. डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर,  डॉ. सदानंद राऊत, पुणे.

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार – संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे.

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी –

धर्मा विश्वासराव वानखेडे, आरोग्य सहाय्यक, अमरावती.

मिलिंद मनोहर लोणारी, स्वच्छता निरीक्षक, जळगाव.

प्रशांत संभाप्पा तुपकरी, आरोग्य कर्मचारी, हिंगोली.

किशोर वैद्य, आरोग्य कर्मचारी, नागपूर.

दिलीप बाबूराव कचेरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे.

प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  पुरस्कार वितरण कार्यक्रमात “माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अभियान”चा दुसरा टप्पा आणि “बाल सुरक्षा अभियान” सुरु केले जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!