फलटण शहरात ‘हनी ट्रॅप’ करणारी टोळी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२३ | फलटण |
फलटण शहरात ‘हनी ट्रॅप’ करून लुटणारी टोळी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून जेरबंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीतील दोन महिला व दोन विधीसंघर्षित बालकांसह एकूण ७ जणांना ताब्यात घेतले आहे. या टोळीने फिर्यादीचे व्हिडिओ शूटींग करून त्यांच्याकडून ५० हजार रुपये एटीएममधून परस्पर काढून घेतले आहेत. तसेच फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली आहे.

ऋषिकेश प्रल्हाद बोडरे (वय २३, रा. खुंटे, ता. फलटण), धीरज अमोल लगाडे (वय १९), प्रतिक विजय भंडलकर (वय १९, दोघेही रा. खुंटे, ता. फलटण), सौ. मोनिका उर्फ साक्षी किसन मोहिते (वय २३, रा. शिंदेवाडी, ता. फलटण, हल्ली रा. पाचबत्ती चौक, फलटण), सौ. सुहासिनी योगेश अहिवळे (वय २९, मूळ रा. मंगळवार पेठ, फलटण, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण) व इतर दोन विधीसंघर्षित बालक अशी आरोपींची नावे आहेत.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ६ जुलै २०२३ रोजी फिर्यादी यास टोळीतील आरोपी यांनी आपापसात संगनमत करून महिला आरोपीमार्फत फिर्यादीस भेटायचे व पाहायचे आहे, असे सांगून पाचबत्ती चौक येथील भाड्याच्या खोलीत बोलावून तेथे इतर आरोपींना बोलावून घेऊन मारहाण केली तसेच मोबाईल हॅण्डसेट काढून घेतला. यावेळी आरोपींनी फिर्यादीस जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून विंचुर्णी रोडलगत आयटीआय कॉलेजच्या जुन्या इमारतीजवळ नेऊन तेथेदेखील शिवीगाळ व दमदाटी व मारहाण केली. फिर्यादीस गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन फिर्यादीचे व्हिडिओ शूटींग करून महिला आरोपी ही पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादीकडून आर.सी. बुक काढून घेतले व हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांना मित्राकडून ऑनलाईन पैसे घेण्यास सांगून आरोपींनी एटीएम मधून ५० हजार रुपये परस्पर काढून घेतले आहेत, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे यांना गुन्हे तपासकामी सूचना देऊन खास पथकाची नेमणूक केली. गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी ऋषिकेश प्रल्हाद बोडरे (रा. खुंटे) हा मिळून आला. त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता इतर आरोपींची नावे व पत्ते निष्पन्न करून त्यांना दोन विधीसंघर्षित बालकांसह ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन केनेकर, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, पो.ह. वाडकर, पो.ना. जगताप, लोंढे, वाघ, बोबडे, तांबे, पो.कॉ. जगदाळे, अवघडे, पाटोळे, गायकवाड, खरात, खराडे, नाळे, टिके, करपे यांनी केली.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
फलटण शहर पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशाप्रकारे कोणी धमकावून खंडणी अथवा पैसे घेतले असल्यास संबंधित पीडित तक्रारदार यांनी कोणाच्याही दबावाला अथवा धमकीला बळी न पडता फलटण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवावी.


Back to top button
Don`t copy text!