दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण बसस्थानकावरील श्री दत्त मंदिर येथे फलटणमधील प्रसिद्ध डॉ. सचिन ढाणे यांची लॅपटॉप असलेली बॅग विसरली होती. कर्तव्यावरील सुरक्षारक्षक सायंकाळी ६.३० वाजता दत्त मंदिर येथे लाईट लावण्यासाठी गेले असता त्यांना सदरची बॅग दिसली, त्यांनी सदरची बॅग जमा करून घेतली व आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना बॅगेबाबत सांगितले. बॅगेबाबत लक्षात आल्यानंतर डॉ. सचिन ढाणे यांनी फलटण आगारात बॅग हरवल्याबाबत चौकशी केली असता, सुरक्षारक्षक गणेश सरक यांनी लॅपटॉप सापडल्याचे ढाणे यांना सांगितले व ओळख पटवून लॅपटॉप डॉ. ढाणे यांना सुपूर्द करण्यात आला.
लॅपटॉप परत केल्याबद्दल फलटण आगाराचे वतीने आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे यांनी सुरक्षारक्षक गणेश सरक यांचे अभिनंदन केले. तसेच डॉक्टर सचिन ढाणे यांनी सरक यांचा शाल, श्रीफळ देऊन उचित सत्कार केला व धन्यवाद व्यक्त केले.
फलटण आगाराचे सुरक्षारक्षक गणेश सरक यांनी भारतीय सैन्यात ‘एयर ड्रॉपिंग’मध्ये १९ वर्ष आपली सेवा बजावली. सरक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सरक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.