
मा. राहुल गांधी संस्कारक्षम राजकारणी आहेत. काहीसे भावनाप्रधान परंतू वैचारिक स्पष्टता असलेले आणि आपले विचार परखडपणे मांडणारे निर्भीड नेते आहेत. कुटुंबातूनच मिळालेला मानवतावादी विचारधारेचा वारसा त्यांनी अधिक विस्तृतपणे जोपासला आहे. मागील काही वर्षात अनेक विषयांवर आपली मते व्यक्त करताना होणाऱ्या राजकीय परिणामांचा विचार त्यांनी कधीच केला नाही. हाथरस, लखीमपूर खेरी सारख्या दुर्दैवी घटना असोत किंवा नोटबंदी व जीएसटी सारखे सरकारी निर्णय असोत, राहुलजींनी अत्यंत तीव्रतेने त्याला विरोध केला. त्यावरुन त्यांच्या संवेदनशील मनाची व प्रगल्भ विचारांची साक्ष पटते.
राहुजींनी आपल्या जीवनात अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवले आहेत. त्यांच्या बालपनापासूनच अशा काही घटना घडल्या की, त्यांचे सारे जीवन बदलून गेले. अनपेक्षितपणे उभ्या ठाकलेल्या कित्येक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची वाटचाल खडतर होतीच, त्यात भरीस भर म्हणून विरोधकांनी व्देष, मत्सर व मानहानीचे कुटील राजकारण करुन त्यांच्या राजकीय वाटचालीतही अडथळे निर्माण केले. राजकारणात वैचारिक व पक्षीय विरोध असणे स्वाभाविक आहे, तो आपण समजूही शकतो. पण विरोधकांनी राहुलजी व गांधी कुटुंबाच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर अत्यंत गलिच्छ राजकारण सुरु केले आहे. ज्या कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी आपली सारी संपत्ती दान केली, ज्यांच्या तीन पिढ्यांनी तुरुंगवास भोगला व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत योगदान देत असतांना ज्या कुटुंबातील कर्तृत्ववान दोन दोन व्यक्ती शहीद झाल्या; अशा नेहरु-गांधी कुटुंबाला देशद्रोही म्हणण्याइतपत हीन दर्जाचे राजकारण विरोधकांनी केले. त्यातूनच अन्यायाविरुध्द लढण्याची जिद्द राहुलजींमध्ये निर्माण झाली. त्यांच्या भाषणातही दांभीक प्रवृत्ती व प्रतिगामी विचारांविरुध्द तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त होतात. या काहीशा आक्रमक वाटणाऱ्या संघर्षात्मक पवित्र्यामागील राहुलजींची भूमिका नीट समजून घेतली पाहिजे. मुळात राहुलजी अत्यंत प्रेमळ स्वभावाचे व सहनशील वृत्तीचे आहेत. त्यांच्या वाटचालीकडे कोणताही दुराग्रह न ठेवता डोळसपणे पाहिले तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, शिस्तबद्धता, परिश्रमशीलता, उच्च शिक्षणातील त्यांची ज्ञानलालसा, संशोधन वृत्ती आणि देशावासियांबद्दलची त्यांची कुटुंबवत्सलता याचे मनोहारी दर्शन घडते.. भारत जोडो यात्रेत जनतेने ते अनुभवले आहे.
दुर्दैवाने भारतात आज व्यक्तीव्देषाने बरबटलेले, आत्मकेंद्री, दिशाहीन, सत्तापिपासू राजकारण सुरु आहे. ‘सत्ता हेच सर्वस्व आणि सत्ता हेच ध्येय’ हा विचार बळावत चालला आहे. राजकारणातील नैतिकता, सामाजिक मूल्ये, विचारधारा व विश्वासाहर्ता हे सूत्र मागे पडून त्याची जागा साम, दाम, दंड व भेद या सूत्राने घेतली आहे. अफाट संपत्तीच्या जोरावर माणसे आणि मते विकत घेता येतात, सत्तेच्या जोरावर प्रसिद्धी माध्यमे मुठीत घेऊन विरोधकांना नामोहरण करता येते हा नवा वस्तुपाठ राजकारणात दृढ होत चालला आहे. मागील चार पाच वर्षात मोदी-शहा जोडगोळीने विरोधकांची निवडून आलेली सरकारे ज्या पध्दतीने पाडली व सत्ता बळकावली हे त्याचेच द्योतक आहे. मात्र हे महाभाग याला ‘चाणक्य नीती’ चा मुलामा चढवून स्वतःची पाठ थोपटून घेतात. चाणक्य कसले? ते तर लोकशाहीचे व संविधानाचे मारेकरी आहेत. महागाई, बेरोजगारी, गरिबी, असमतोल विकास, आर्थिक विषमता असे जनतेला भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी लोकांना धार्मिक-जातीयवादात गुंतवून त्यांची दिशाभूल करायची हे सध्याच्या राजकारणाचे आणखी एक सूत्र झाले आहे. असं म्हंटल जातं की, धर्म ही अफूची गोळी आहे. तीच्या गुंगीने लोक आपल्या गंभीर समस्या विसरतात व प्रसंगी एकमेकांच्या जीवावर उठतात. एकाअर्थाने लोकांना मानसिक गुलाम बनविण्याचाच हा प्रकार आहे. त्यासाठी धर्माचा वापर केला जातो. भाजपाचे सध्याचे राजकारण जनतेचे प्रश्न सोडविणारे नसून जनतेला अफूची गोळी देणारे आहे. त्यामुळे समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या स्तंभांवर आधारलेली भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे नेतृत्व सर्वार्थाने आश्वासक व देशहिताचे वाटते. पंडित नेहरु, इंदिराजी, राजीवजी व सोनियाजी यांच्याप्रमाणे राहुलजींच्या मनातही प्रखर ध्येयवाद, देशप्रेम, देशसेवा, स्वार्थत्याग व जिद्द या भावना पेरल्या गेल्या आहेत. सत्ता असो अथवा नसो देशासाठी व जनतेसाठी काम करीत राहणे हा गुण त्यांना वारसा हक्काने मिळाला आहे. आपल्या निर्भीड, सडेतोड भूमिकेने राहुलजींनी हे सारे गुण अधिक प्रखर केले आहेत. येथे राहुलजींच्या जीवनातील एका प्रसंगाची प्रकर्षाने आठवण येते.. ‘दहशतवाद्यांनी राजीव गांधींची निर्घुण हत्या केली. वडिलांच्या बलिदानानंतर राहुल व प्रियांकांना मोकळेपणाने राहणे मुश्किल झाले. शाळेत जाऊन शिक्षण घेणेही अवघड झाले होते. राहुलजींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःचे नाव बदलून लंडनमधील एका विद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. अशा बिकट प्रसंगातही विचलित न होता राहुलजींनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. केंब्रिज विद्यापीठाची फेलोशिप मिळवून मॅनेजमेंट विषयात सुवर्णं यश प्राप्त केले. या सगळ्या कालखंडात त्यांच्या बालमनावर किती आघात झाले असतील, त्यांनी किती वेदना सहन केल्या असतील याची साधी कल्पनासुध्दा अंगावर शहारे आणणारी आहे..’ राहुलजी किती जिद्दी आहेत हे यावरुन सिध्द होते. आपल्या जीवाला धोका आहे याची जाणीव असूनही राहुल गांधी सोनियाजींच्या सोबत राजकारणात उतरले. काँग्रेस पक्षाची व देशाची गरज म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. सोनियाजींच्या नेतृत्वाखालील पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांच्या युपीए सरकारच्या काळातही राहुलजी जनतेच्या प्रश्नांसाठी आग्रही होते हे आपण पाहिले आहे.
भूमीअधिग्रहण कायदा व मनरेगा सारख्या अनेक योजना राहुलजींच्या दूरदृष्टीतून साकारल्या आहेत. मोदी सरकार २०१४ साली सत्तेत आले आणि सामान्य माणसांची गळचेपी सुरु झाली. तेंव्हापासून या सरकारच्या दडपशाहीला न जुमानता राहुल गांधी जनतेच्या प्रश्नांवर सातत्त्याने आवाज उठवत आहेत. मोदींचे कार्पोरेट धार्जिणे आर्थिक धोरण ओळखून २०१५ साली राहुलजींनी या सरकारचे वर्णन ‘सूट-बूट की सरकार’ असे केले होते. भविष्यात हे सरकार केवळ बड्या उद्योगपतींसाठी काम करेल असा इशारा त्यांनी दिला होता. आज कायदे बदलून गौतम अदानी सारख्या भ्रष्ट उद्योगपतीला केली जाणारी मदत ही त्याची साक्ष आहे. जमीन अधिग्रहण कायद्यातील बदल, नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, दिशाहीन परराष्ट्र धोरण, चीनची घुसखोरी, कोरोना काळातील सरकारचे अपयश, आर्थिक धोरणातील त्रुटी यांसारख्या मोदी सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचा इशाराही राहुलजींनी वेळोवेळी दिला होता. त्यावेळी त्यांच्या इशाऱ्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही. मीडियाने तर राहुजींचीच चेष्टा केली होती. मात्र आता ९ वर्षांनंतर राहुलजींचा प्रत्येक इशारा खरा ठरताना दिसत आहे. भारताची अर्थव्यवस्था रसातळाला जाऊन बसली आहे. रुपयाच्या अवमूल्यनाचा नीचांक झाला आहे. भारतातील मध्यम-लहान उद्योग कोलमडून पडले आहेत. शेती आणि शेतकरी उध्वस्त झाले आहेत. महागाई आकाशाला भिडली आहे आणि बेरोजगारीने तरुणांना जगणे मुश्किल केले आहे. गरीब अतीगरीब व श्रीमंत अतीश्रीमंत होत आहेत. अदानी सारखे मोठे उद्योगपती सरकारच्या व जनतेच्या पैशाची लूट करीत आहेत. मात्र पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार ‘ढिम्म’ आहे. मोदी सरकारला जनतेची फिकीर नाही. सत्ता गमावण्याची भीती त्यांना वाटत नाही. कारण धार्मिक ध्रुवीकरणाचे व जातीयवादाचे तळपते हत्यार त्यांनी तयार ठेवले आहे. जोडीला बेलगाम सत्ता व अफाट संपत्ती आहे. त्यांना न्याय व्यवस्थेसह निवडणूक आयोगाचीही भीती वाटत नाही. प्रसिध्दी माध्यमे तर दिवसभर मोदी नामाचा जप करीत असतात. विरोधी नेत्यांना व पक्षांना प्रसिध्दी माध्यमात इंचभरही स्थान मिळत नाही.
लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असलेल्या सगळ्या व्यवस्था मोदींनी ताब्यात घेतल्या. संसदेसह लोकशाहीतील सर्व साधनांचे दरवाजे बंद झाले. मग जनतेचा लढा लढण्यासाठी राहुल गांधी थेट रस्त्यावर उतरले. कन्याकुमारी ते काश्मीर अशी देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ त्यांनी सुरु केली. जनतेला दैनंदिन भेडसावणारे प्रश्न मांडत आणि ‘नफरत की बाजार में मोहोब्बत की दुकान खोलने आया हूं’ हा संदेश देत राहुलजींची पदयात्रा सुरु झाली. भारत जोडो यात्रेत ‘जनतेच्या प्रश्नांचा जनतेशीच सुसंवाद’ असा अनोखा प्रयोग राहुल गांधींनी सुरु केला. लोकांचे प्रश्न लोकांकडून समजून घ्यायचे आणि देशापुढील गंभीर समस्या लोकांना सांगायच्या असे या प्रयोगाचे स्वरुप होते. मीडियाच्या माध्यमातून देश विश्वगुरू झाल्याचा व देशापुढे आता कोणत्याच समस्या शिल्लक नाहीत असा आभास निर्माण केला जात होता.. राहुलजींच्या जनसंवादाने या आभासाचे बिंग फुटले व मीडियातील प्रचार किती खोटा आहे हेही सिध्द झाले. अत्यंत प्रेमाने, आदराने, आपुलकीने भेटणारे राहुल गांधीं जनतेला आपला आधार वाटू लागले. लाखोंच्या संख्येने लोक राहुलजींसोबत चालू लागले. त्यामध्ये महिला व तरुणांची संख्या लक्षनीय होती. भारत जोडो यात्रा प्रचंड यशस्वी झाली… एका भारत जोडो यात्रेने मोदी सरकार विचलित झाले. राहुलजींच्या नेतृत्वाची मोदींनी धास्ती घेतली. ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान मनातून हादरुन गेले व भीतीपोटी त्यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. त्यांच्याकडे असलेले राहते घरही काढून घेतले. ज्याच्या कुटुंबाने आपली जमीन, मोठे महाल, शहरांतील मोक्याच्या जागा देशसेवा करताना दान केल्या त्या कुटुंबातील राहुल गांधींना बेघर करतांना जराही शरम वाटली नाही, इतके मोदी निर्दयी वागले. चोराला जशी दिव्याची भीती, तशी मोदी-शहांना राहुल गांधींची भीती वाटत आहे.
राहुल गांधी केवळ व्यक्ती नाहीत; राहुल गांधी हा प्रखर सत्याचा तेजस्वी विचार आहे… जनतेचे परिवर्तन घडवण्यात त्यांना यश मिळत असून जनतेच्या डोळ्यावरची भ्रमाची पट्टी आता दूर होऊ लागली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेला प्रचंड विजय हा भारत जोडो यात्रेच्या प्रखर तेजाचा प्रभाव आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकांतही राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नेत्रदीपक यश मिळवले होते. कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थान या चार राज्यात काँग्रेसची सत्ता आली होती. गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. झारखंडमध्ये काँग्रेसच्या सहभागाने मित्रपक्षांची सत्ता स्थापन झाली होती. २०१७ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचली होती. पंतप्रधान मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये राहुलजींच्या झंजावती प्रचाराने भाजपाची दमछाक झाली होती. मोदी-शहा आणि त्यांचे सारे केंद्रीय मंत्रिमंडळ गल्लीबोळात फिरत होते. कार्पोरेट क्षेत्राने सर्व शक्ती भाजपाच्या पाठीशी उभी केली, अन्यथा राहुलजींनी गुजरात जिंकलेच होते. विशेष म्हणजे भाजपाच्या कुटनीती विरोधात त्यावेळी राहुलजी एकाकी लढत होते. दुर्दैवाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र ती निवडणूक भाजपाने कट कारस्थान करुन जिंकली हे उघड सत्य आहे. पुलवामा घडले नसते तर भाजपाचा पराभव अटळ होता. २०१८ साली राहुलजींनी मिळवलेले यश निखळ होते, २०१९ च्या मोदींच्या यशाला भारतीय जवानांच्या बलिदानाची किनार होती. मात्र गोदी मीडियाला राहुलजींचे प्रभावी नेतृत्व दिसले नाही ; मात्र त्यांना मोदींचा अवसरवादी फसवा करिष्मा दिसला. प्रसिध्दी माध्यमांनी राहुलजींवर नेहमीच अन्याय केला ही वस्तुस्थिती आहे.
मा. राहुल गांधींसारख्या सच्च्या व निर्मळ मनाच्या नेत्याची आज देशाला गरज आहे.. जनतेने दिलेली सत्ता जनतेसाठी राबवायची असते हे निर्भीडपणे सांगणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा आहे. म्हणूनच जनता राहुलजींकडे आशेने पाहात आहे. मोदींच्या फसव्या पोपटपंचीपेक्षा राहुलजींचे रोखठोक बोलणे लोकांना भावले आहे. पोकळ घोषणा व जाहिरातबाजीवर चाललेले मोदींचे हुकूमशाही सरकार उलथून टाकण्यासाठी जनता आतुर झाली आहे. आता राहुलजींच्या विलक्षण नेतृत्वाचा आधार जनतेला मिळाला आहे. राहुलजींनी कर्नाटक जिंकले आहेच, आता छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान पाठोपाठ २०२४ ची लोकसभा जिंकेपर्यंत हे वादळ शमणार नाही. कारण जनतेचा झंजावात या वादळाला अधिक गतिमान करीत आहे. जनतेची मनोकामना पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना…
वाढदिवसानिमित्त राहुलजींना मनःपूर्वक शुभेच्छा !!
– राजेंद्र शेलार, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.