दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
जीवन हसत हसत जगावे. मानवी जीवनात सुखी राहण्यासाठी छंद जोपासले पाहिजेत. छंद माणसाला दीर्घायुषी बनवतात. चांगले छंद जोपासले तर त्याचा फायदा स्वतः बरोबर इतरांनाही होतो. लेखन, वाचनातून माणूस घडतो व त्याचे आयुष्य बदलते. साहित्य संवाद कार्यक्रमातून ऊर्जा मिळते, असे मत सेवानिवृत्त कृषी अधिकारी व साहित्यप्रेमी प्रमुख पाहुणे सुगम शहा यांनी नाना-नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वनविभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘साहित्यिक संवाद’ या कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी प्रा. सुधीर इंगळे, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, युवा साहित्यिक विकास शिंदे, वन अधिकारी राहुल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुगम शहा पुढे म्हणाले की, साहित्याच्या सहवासामुळे ऊर्जा मिळाली. देशी खा, वास्तववादी लिहा व आरोग्यदायी बना. भ्रष्टाचार मुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न करून लेखणीतून समाजजागृती केली पाहिजे. यावेळी सुजन फाऊंडेशन फलटणचे अध्यक्ष अजित जाधव यांनी ‘पुण्यश्लोक’ हा संपादित काव्यसंग्रह सर्वांना भेट देऊन फाऊंडेशनच्या साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी श्रावणधारा काव्यमैफलीत प्रा. अशोक माने यांनी ‘पाऊस पडेल का?’, ताराचंद्र आवळे यांनी ‘तुम्हीच सांगा…’, राहुल निकम यांनी ‘असा पाऊस निघाला’, विकास शिंदे यांनी ‘तु पाऊस’, कु. दामिनी ठिगळे यांनी ‘महादेव’, कु. अस्मिता खोपडे यांनी ‘शक्तीस्वरूप नारी’ अशा विविध ढंगातील कविता सादर करून सर्वांची मने जिंकली. काव्यमैफल बहारदार रंगली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ऑगस्ट महिन्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे निधन झाले, त्या सर्वांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी साहित्यिक चर्चा यामध्ये काव्यलेखन व विविध साहित्यिक आठवणी यावर साहित्यिकांनी प्रकाशझोत टाकला. सर्व साहित्यिकांचे वनविभागाच्या वतीने एक रोप भेट देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सुधीर इंगळे यांनी मानले. यावेळी साहित्यप्रेमी सचिन जाधव, मंगेश कर्वे, सानिया शेख व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.