राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा

स्थैर्य, मुंबई, दि. १८ : ‘अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला’… याच कृतार्थ भावनेने राज्यभरातील शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावरच अवलंबुन आहे. या कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या बरोबरीने बैल राबत असतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचे बैलांप्रती भावनिक नाते असते. राज्यभरातील शेतकरी आपल्या प्रदेशानुसार तिथीनुसार येणाऱ्या अमावस्येला बैल पोळा सण साजरा करतो. काही ठिकाणी पोळा सणाला बेंदूर ही म्हटले जाते. जरी राज्यात हा सण वेगळ्या नावाने, वेगळ्या तिथीला साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्यामागे सर्व शेतकऱ्यांची बैलांप्रती कृतज्ञतेची भावना सारखीच असते. सध्या राज्यभर चांगला पाऊस सुरु आहे, त्यामुळे पिकेही जोमात आहे, पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात चांगले अन्न-धान्य पिकेल, निराशेचे मळभ दूर होऊन राज्यात बैल पोळा सण निश्चितच समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!