जांब गावाने घडविला इतिहास ग्रामपंचायत बिनविरोध : प्रारंभ नव्या पर्वाचा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भुईंज, दि.५ : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अग्रणी आणि सनदी अधिकारी घडवणारे गाव म्हणून सर्वदूर ओळख असणाऱ्या जांब गावची ग्रामपंचायत निवडणूक निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आणि गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यास दिलेल्या प्रतिसादाने बिनविरोध पार पडली. आजपर्यंत राजकीय धुमश्चक्रीचा जांबचा पूर्वलेख पाहता ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे.

जांब गावात राजकीय संघर्ष टोकाचा होत राहिला आहे. त्यातून होणाऱ्या वाद आणि भांडणांनी पोलीस ठाणे, न्यायालयाचे दरवाजे अनेकदा पाहिले. तर दुसरीकडे या गावाने अनेक अधिकारी घडवत तसेच राजकीयदृष्ट्या महत्वाची पदे गावात आणत वेगळी ओळखही निर्माण केली. प्रशासन सेवेतून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी तानाजी शिंदे यांनी प्रशासनात असताना जांबचा लौकिक सर्वदूर पोहोचवलाच शिवाय गावात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, जलसंधारण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात स्वतः योगदान देत गावाला सोबत घेऊन अनेक विकासकामे उभारली. याच तानाजी शिंदे यांनी जेव्हा जाहीर झालेली निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले तेव्हा त्याला कितपत प्रतिसाद मिळेल अशी शंका होती. कारण ही निवडणूक नेहमीच अटीतटीची होत आली आहे. मात्र तानाजी शिंदे यांची शिष्टाई आणि तळमळ यशस्वी होऊन तसेच गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, विशेषतः मोठ्या प्रमाणावर तरुण कार्यकर्त्यांचा आग्रह, रेटा असल्याने दोन्ही बाजूच्या नेत्यांना प्रतिसाद द्यावा लागून ही निवडणूक बिनविरोध पार पडली. जांब गावचे प्रमोद शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. मनीषा शिंदे या दोघांनी तालुक्याचे सभापतीपद भूषवले असून प्रमोद शिंदे सध्या राष्ट्रवादीचे वाई तालुकाध्यक्ष आहेत. तर जांब ग्रामपंचायतीत सध्या किसन वीर कारखान्याचे संचालक पै. मधुकर शिंदे यांची सत्ता आहे. प्रमोद शिंदे हे माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे तर पै. मधुकर शिंदे हे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या खास मर्जीतील. मानसपुत्र म्हणून त्यांची ओळख. आपापल्या पक्षात अग्रणी असणाऱ्या या दोन्ही गटांच्या नेत्यांनी सामंजस्य दाखवत दिलेल्या प्रतिसादाने अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल झालेला एकमेव जादाचा अर्ज माघारी घेतला गेल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या ऐतिहासिक घटनेने जांबच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचे बोलले जात असून ज्यांनी अर्ज माघारी घेऊन, तसेच ज्यांनी अर्ज न भरून या प्रक्रियेत योगदान दिले त्यांचे व सर्व कार्यकर्ते यांचे तानाजी शिंदे व दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी आभार मानले. बिनविरोध प्रक्रियेद्वारे सौ. उषा संजय वाघमारे, सौ. रुपाली विक्रम शिंदे, प्रताप नारायण शिंदे, सौ. सुजाता संजय शिंदे, सूर्यकांत शंकर पिसाळ, सौ. सुजाता राजेंद्र शिंदे, अभिजित अशोक शिंदे, सौ. उषा दत्तात्रय गायकवाड, सौ. सुजाता सतीश गायकवाड, हणमंत हिंदुराव शिंदे, कु. विद्याश्री तानाजी शिंदे, सौ. छाया दीपक शिंदे, पपुभाई मियाभाई इनामदार यांची सदस्यपदी निवड झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!