लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक सफर…!! ( भाग – 3 ) लत्तलूर ते लातूर…!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2021 | फलटण | चौथ्या शतकात कुंतल प्रदेशाची निर्मिती झाली…. अश्मक जनपदाचा लातूरचा भाग कुंतल प्रदेशाला जोडला गेला, कुंतल प्रदेशावर राष्ट्रकुटाचे राज्य होते. आज जो सातारा जिल्ह्यातील माण तालुका आहे… त्या तालुक्यातील माणगंगा नदीच्या तिरावर आजच्या देवापूर जवळ….140 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी माणगंगा नदीवर जे राजेवाडी धरण बांधले त्यात राष्ट्रकुटाच्या कुंतल राजधानीचे अवशेष होते. मी राजेवाडीचे धरण बघायला गेलो त्यावेळी त्या धरणात तुडुंब पाणी होते. पण पाळूच्या शेजारी घाण्याचे मोठे चाक मला दिसले होते. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की, 735 ला लत्तलूर ( लातूर ) नरेश दंतीदुर्ग यांचा उल्लेख असला तरी त्यापूर्वी या घराण्याने कुंतल सारख्या छोट्या प्रदेशावर राज्य केले होते.


माणगंगा नदीचा उगम कुळकजाई सीतामाई डोंगरातून होतो.. हा डोंगर महादेव डोंगर रांगातला असून तिथल्याच डोंगरावर शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र आहे. लातूरच्या राज्याचे राज्य कुंतल प्रदेशावर होते.. त्यावेळी हे देवस्थान असावे पण हा भाग आवर्षण पटयात येतं असल्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात स्थलांतर झाले असावे म्हणून आजही पश्चिम महाराष्ट्र पेक्षा पिढ्यानं पिढ्या शिखर शिंगणापूरला जाणारे लोक उस्मानाबाद,लातूर, बिड, परभणी भागातले अधिक आहेत.
श्री. ग.ह. खरे यांनी त्यांच्या संशोधनातून कुंतल नामक प्रदेशावर राष्ट्रकुटाची सत्ता होती, त्यात आजच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि आजच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याचा समावेश होता… तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंतलगिरी या स्थलनामावरून माणापूरच्या राष्ट्रकुटांच्या कुंतल राज्यात उस्मानाबाद आणि लातूरचा समावेश होता हे सिद्ध केले आहे.

लोकपरंपरा आणि स्थलमहात्म्य
लेखात वर उल्लेख केल्याप्रमाणे मार्च महिन्यात येणारी महाशिवरात्रीची शिखर शिंगणापूरच्या यात्रेत सर्वाधिक भाविक उस्मानाबाद,लातूर भागातले येतात. मागच्या दोन वर्षात कोरोना काळात सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी यात्राबंदी आदेश काढले त्यावेळी उस्मानाबाद, लातूर, बिड, परभणी इथून अधिक लोक येतात म्हणून इकडे निवेदन प्रसिद्धीस दिले होते. यावरून हेच सिद्ध होते की या लोकांच्या या धार्मिक परंपरा प्राचीन असून त्याचं बुड माणगंगा नदीच्या तिरावर असलेल्या राष्ट्रकूट घराण्यातील मानाङ्क राजाचे राज्य होते त्यात असावे.
राष्ट्रकुट राजघराण्याबद्दल कर्नूल आणि दायंदिने ताम्रपटातील स्थलनामावरून लातूर आणि राष्ट्रकुट यांचे संबंध अधोरेखित करता येतात. तलयखेड म्हणजे लातूर जिल्ह्यातील तळीखेड हे गाव तेरणा नदी काठी निलंगा तालुक्यात आहे. यात चिंचवली म्हणजे चिंचोली ( ता. लातूर ) अंजिरीका नदी म्हणजे वांजरा किंवा मांजरा नदी जी पूर्ववाहिनी असून लातूर जवळ दक्षिण वाहिनी होते. यावरून सातव्या शतकापूर्वीही लातूरचे नाव मोठे होते… चालुक्य काळापर्यंतही लातूर आपले महत्व टिकवून होते. ( संदर्भ ग. ह. खरे भारत इतिहास संशोधन मंडळ ).
ही लेख माला लिहण्यामागचा उद्देश लातूरचे प्राचीन महत्व तर अधोरेखित करणे आहेच… पण राष्ट्रकुट यांचे मूळ गाव लत्तलूर.. पुढे ते दक्षिणेत “मान्यखेत” आणि विदर्भात एलिचपूर ( आजचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका ) येथे राजधानी स्थापून दक्षिण भारत आणि मध्य भारतावर राज्य केले. त्यावेळी लत्तलूरचे वैभव किती मोठे असेल याची कल्पना तुम्ही करावी ते तुमच्यावर सोपवतो.

@ युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर


Back to top button
Don`t copy text!