फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव सुरु; सोमवार दि. २ डिसेंबर हा या यात्रेचा मुख्य दिवस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज बुधवार दि. २७ नोव्हेंबर पासून श्रीराम मंदिर परिसरात दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती या ५ वाहनांद्वारे परंपरागत पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. आज बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी ह्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी ही वाहने व मिरवणूक  पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.

येथील ऐतिहासिक  श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा सोमवार दि. २ डिसेंबर हा या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघणार असून परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा पूर्ण करुन सायंकाळी श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे.

रविवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रभू श्रीरामाच्या रथाला लघुरुद्राभिषेक करण्यात येणार आहे.

सोमवार दि. २  डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती राज घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रथ सोहळा परंपरागत पद्धतीने शहरातील रथ मार्गावरुन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन सायंकाळी ७ वाजता रथ सोहळा श्रीराम मंदिरात परत येईल.

त्यानंतर शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी श्रींची पाकाळणी, सकाळी काकड आरती आणि नंतर ११ ब्राह्मणांच्याकडून लघुरुद्र व महापूजा झाले नंतर या यात्रेची सांगता होणार आहे.

नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २६० वर्षांपूर्वी रथयात्रेची ही प्रथा सुरु केली असून आजही परंपरागत पध्दतीने सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्री रामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते.

ह्या उत्सवा दरम्यान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने असतात तसेच मोठे पाळणे हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते.

श्रीराम मंदिर आणि परिसरासह रथ मार्गावर नगर परिषद नेहमी स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करते, पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो.


Back to top button
Don`t copy text!