फलटणच्या इतिहासात सुवर्णपान! साताऱ्याची वारी कायमची संपली; तब्बल ५ उच्च न्यायालयीन न्यायमूर्तींच्या उपस्थितीत ‘अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालया’चे दिमाखदार उद्घाटन
"कोर्ट हे पक्षकारांसाठी आहे, साहेबांना सॅल्युट मारण्यासाठी नाही," न्यायमूर्ती संजय देशमुख यांचे खडेबोल; तर रणजितसिंह निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या प्रयत्नांचे मान्यवरांकडून भरभरून कौतुक.

फलटणकरांची साताऱ्याची ७० किमीची वारी आता थांबली असून, शहरात बहुप्रतिक्षित ‘अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालया’चे ऐतिहासिक उद्घाटन संपन्न झाले आहे. माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या तब्बल ५ न्यायमूर्तींची उपस्थिती या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली.
स्थैर्य, फलटण, दि. १५ फेब्रुवारी : फलटणच्या न्यायिक आणि प्रशासकीय इतिहासात आजचा महाशिवरात्रीचा दिवस सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला आहे. न्याय मिळवण्यासाठी फलटणकरांना साताऱ्यापर्यंत करावी लागणारी ७० ते ८० किलोमीटरची जीवघेणी वारी आता कायमची थांबली असून, शहरात बहुप्रतिक्षित ‘वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालया’चे अत्यंत थाटात आणि दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे तब्बल ५ न्यायमूर्ती उपस्थित होते, जी फलटणसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासह महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे संचालक कोंडे देशमुख व भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
रणजितदादांच्या प्रयत्नांना यश; आता ‘जिल्हा निर्मिती’चे लक्ष्य : ॲड. एन. एम. जाधव
प्रास्ताविकात फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एन. एम. जाधव यांनी भावना व्यक्त केल्या. “सातारा ते फलटण या मोठ्या अंतरामुळे अनेक वकील आणि पक्षकारांचे अपघात झाले आहेत. मात्र, आता हे न्यायालय सुरू झाल्याने वेळ, पैसा आणि जीव वाचणार आहे. हे न्यायालय मंजूर करून आणण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे विशेष प्रयत्न आणि मोठा वाटा आहे. सध्या शहरातील न्यायालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ती एकाच प्रशस्त इमारतीत यावीत. तसेच धर्मादाय आणि सहकार न्यायालयही सुरू करून फलटण ‘जिल्हा निर्मिती’चे स्वप्न रणजितदादांनी प्रत्यक्षात आणावे,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
दोन दिवसांत २०४५ केसेस ट्रान्सफर; उद्यापासून थेट कामकाज : प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाघमारे
सातारा जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश वाघमारे यांनी प्रशासकीय गतीमानतेचा दाखला दिला. “फलटणला न्यायालय मंजूर होताच आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या २ दिवसांत तब्बल २०४५ केसेस फलटणला ट्रान्सफर केल्या आहेत. ई-सुविधा आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सज्ज असलेल्या या न्यायालयात उद्याचा ‘बोर्ड’ तयार असून, उद्यापासूनच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे,” अशी आनंददायी घोषणा त्यांनी केली.
“कोर्ट हे साहेबांना सॅल्युट मारण्यासाठी नाही!” : न्यायमूर्ती संजय देशमुख
मूळचे साताऱ्याचे सुपुत्र असलेले आणि फलटण कोर्टात काम केलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी अत्यंत रोखठोक विचार मांडले. “आज माहेरी आल्याचा आनंद होत आहे. ही कार्यक्रम पत्रिका ५० वर्षे जपून ठेवा, हा फलटणचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. न्याय द्यायला उशीर होणे हा व्यवस्थेवरील काळा डाग आहे. इथला पक्षकार हा शेतकरी (अन्नदाता) आहे, त्याला न्याय देण्याचे पवित्र काम झालेच पाहिजे. कोर्ट हे पक्षकारांसाठी असते, साहेबांना सॅल्युट मारण्यासाठी कोर्ट नसते. न्यायाधीश हे पद नम्रतेचा दागिना असले पाहिजे,” असे खडेबोल त्यांनी सुनावले.
“आमची माती, आमची माणसं” : न्यायमूर्ती ए. एन. पानसरे भावुक
बालपण फलटणमध्ये गेलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एन. पानसरे यांनी ‘आमची माती, आमची माणसं’ म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मी बांधकाम व्यावसायिक ते वकील आणि आता न्यायदानाच्या क्षेत्रात आलो आहे. आजच्या उद्घाटनामुळे फलटणकर म्हणून माझेच मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. सरकारी वकील व न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना न्यायालयात ‘कम्फर्टेबल’ केले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच, सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी फलटणच्या जनतेचे कौतुक करत, वकिलांनी पक्षकारांना त्वरित न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले.
दावे पोलीस स्टेशनला चालणे चुकीचे : न्यायमूर्ती नितीन बोरकर
अध्यक्षीय भाषणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. “आज फलटणमध्ये न्यायालयांची साखळी पूर्ण झाली आहे. मात्र, सर्वच कोर्टात ३० ते ४० वर्षांच्या केसेस पेंडिंग आहेत, ही चिंतेची बाब आहे. ज्याप्रमाणे न्यायाधीशांना नियम आहेत, तसेच वकिलांनाही नियम हवेत. सध्या अनेक दावे कोर्टाऐवजी पोलीस स्टेशनला चालतात, हे अत्यंत चुकीचे असून यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. आज सुरू केलेले कोर्ट भविष्यात बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका,” असा सूचक इशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी, फलटणचे पहिले वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी आभार मानताना जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे फलटणच्या वैभवात मोठी भर पडली असून, संपूर्ण तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे.

