प्रशासकीय राजवटीनंतर फलटण नगरपरिषदेत ‘लोकशाहीचा गजर’! ऐतिहासिक सत्तांतरानंतर उद्या पार पडणार पहिलीच सर्वसाधारण सभा; अजेंड्यावर तब्बल ४६ विषय


तब्बल ५ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर फलटण नगरपरिषदेत ऐतिहासिक सत्तांतर झाले असून, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, २५ मार्च रोजी पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेत स्टेडियम, हद्दवाढ आणि नामकरणासह तब्बल ४६ विषयांवर चर्चा होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २४ मार्च : फलटण नगरपरिषदेत तब्बल ५ वर्षांहून अधिक काळ असलेली प्रशासकीय राजवट संपून, मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शहरात एक ऐतिहासिक सत्तांतर घडले आहे. या नव्या लोकशाही पर्वाची आणि विकासाची सुरुवात आता खऱ्या अर्थाने होत असून, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता नगरपरिषदेची ‘पहिलीच’ सर्वसाधारण सभा पार पडणार आहे.

पाच वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर सभागृहात लोकप्रतिनिधींचा आवाज घुमणार असून, पहिल्याच सभेच्या विषयपत्रिकेवर (अजेंड्यावर) तब्बल ४६ मोठे आणि शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय असल्याने या सभेकडे संपूर्ण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

पहिल्याच सभेतील काही अत्यंत महत्त्वाचे विषय:

  • भव्य स्टेडियम आणि क्रीडा संकुल: फरांदवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ५.८४ हेक्टर जागा फलटण शहरासाठी भव्य ‘स्टेडियम आणि क्रीडा संकुल’ विकसित करण्यासाठी हस्तांतरित करून घेण्याबाबत महत्त्वाचा निर्णय या सभेत होणार आहे.

  • शहराची ‘हद्दवाढ’: फलटण नगरपरिषद कार्यक्षेत्राच्या आजूबाजूची गावे, वस्ती आणि वाड्या नगरपालिकेत समाविष्ट करून शहराची ‘हद्दवाढ’ करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. हा शहराच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने मोठा निर्णय ठरू शकतो.

  • संपूर्ण शहरात ‘सीसीटीव्ही’ (CCTV): सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण फलटण शहरात ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा कार्यान्वित करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

  • नमो उद्यान: वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत फलटण शहरात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी जागा निश्चित केली जाणार आहे.

  • नावे बदलण्याच्या विषयावरून रंगणार खडाजंगी? : शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती व सभागृहांची जुनी नावे बदलण्याबाबतचा आहे. जुनी नावे बदलू नयेत यासाठी नुकतेच विरोधी असलेल्या राजे गटाने नगराध्यक्षांना निवेदन दिले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय आणि लोककल्याणाचे इतर विषय:

  • अभय योजना: थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ राबवण्यासंदर्भात आलेल्या अर्जांचा प्रस्ताव शासनास सादर करणे.

  • दिव्यांग आणि महिला बालकल्याण: दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच्या निधीचा दुसरा हप्ता वितरित करणे, तसेच महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय समितीच्या ५ टक्के निधीतील कामांना मंजुरी देणे.

  • नवीन वाहनाची खरेदी: नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या दैनंदिन कामकाजासाठी नवीन वाहन खरेदी करण्यावर चर्चा होणार आहे.

  • यात्रांसाठी तरतूद: शहरातील फिरंगाई, महादेव, काळुबाई आणि भैरवनाथ यात्रांसाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी दिली जाणार आहे.

  • आरोग्य आणि स्वच्छता: ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवणे, शहरातील स्वच्छतागृहे बांधणे आणि नवीन जेटींग मशीन (Jetting Machine) खरेदी करणे.

पाच वर्षांनंतर फलटणकरांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचे सभागृह आणि सत्ताधारी मिळाले आहेत. पहिल्याच सभेच्या अजेंड्यावरील स्टेडियम, सीसीटीव्ही आणि हद्दवाढीसारख्या विकासकामांच्या धडाक्यामुळे नव्या सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. उद्याच्या या ऐतिहासिक पहिल्या सभेत नेमके काय निर्णय होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!