दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । माझ्यावर टक्केवारीचे आरोप करणार्यांचे प्रताप सगळ्या फलटणकरांना माहित आहेत. बिल्डर, ठेकेदार यांना खंडणी मागणार्यांनी चुकीचे आरोप करु नयेत. उठसूठ आरोप करत सुटायचे एवढाच उद्योग त्यांना माहित असून त्यांच्या सगळ्या भानगडी लवकरच पत्रकार परिषद घेवून आपण सर्वांसमोर आणणार असल्याचा इशारा फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पांडूरंग गुंजवटे यांनी दिला आहे.
फलटण नगरपालिकेत पांडूरंग गुंजवटे ठेकेदारांना 15% कमिशन मागत अ्रसल्याचा गंभीर आरोप पालिकेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केला होता. त्याला प्रतिउत्तर देताना पांडूरंग गुंजवटे यांनी सदर इशारा दिला आहे.
देवाने तोंड दिले म्हणून उठसूट आरोप करायचे आणि परत आर्थिक सेटलमेंट करायची ही अशोकराव जाधव यांची जुनी सवयच आहे. राजधानी टॉवरवरुन आरोप करत असताना पालिकेचा कोणता ठराव बेकायदेशीर आहे ते त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. तुम्ही न्यायालयात जरी गेला तरीही ठराव बेकायदेशीर नसल्याचेच सिद्ध होईल. ठराव जर बेकायदेशीर असल्याचे सिद्ध होवून रद्द झाला तर आपण राजकारण सोडून देवू, असेही आव्हान पांडूरंग गुंजवटे यांनी दिले आहे.