स्थैर्य, मुंबई, दि. ९: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घराबाहेर स्काॅर्पिओत जिलेटिनच्या छड्या आढळल्याच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी त्याचे आदेश दिले आहेत. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांचे दहशतवाद प्रतिबंधक पथकच (एटीएस) करेल. दरम्यान, तपासात एनआयएच्या प्रवेशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुंबई पोलिस हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. यंत्रणा फक्त एका माणसासाठी नाही. गेल्या सरकारमध्येही हीच यंत्रणा होती. तरीही जर केंद्र सरकार हे प्रकरण एनआयएकडे सोपवत असेल तर त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, असाच होईल. जोपर्यंत आम्ही ते उघडकीस आणत नाही, तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही.
या प्रकरणात हिरेन प्रमुख साक्षीदार होते. पण त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने हत्येचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी मुंबई एटीएसने रविवारी हत्येचा गुन्हाही दाखल केला आहे. अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक स्कॉर्पिओ कार संशयास्पद अवस्थेत उभी केल्याचे आढळले होते. तपासणी केली असता या कारमध्ये स्फोटकांत वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या २० छड्या आढळल्या होत्या. गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी विधानसभेत म्हणाले, मुंबई पोलिस मृत्यू प्रकरण आणि स्फोटके आढळल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.