हिंदी साहित्यामध्ये उत्तम संस्कार करण्याचे सामर्थ्य – प्रा. डॉ. सुनील बनसोडे


स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : “मोबाईलच्या अतिवापरामुळे आजची तरुण पिढी साहित्य वाचनापासून दूर जात आहे. जर साहित्य वाचलेच गेले नाही, तर नवीन पिढीवर संस्कार कसे होणार? हिंदी साहित्यात अशा अनेक सर्वोत्तम रचना आहेत, ज्यांच्या वाचनाने नवीन पिढीवर नक्कीच चांगले संस्कार होऊ शकतात,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील बनसोडे यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात ‘हिंदी दिवस’ समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचा हिंदी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. बनसोडे पुढे म्हणाले की, नैतिक मूल्यांची जोपासना साहित्य वाचनातूनच होऊ शकते आणि हिंदी भाषा शिक्षणामुळे आज विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषेचे राष्ट्रीय एकात्मतेतील महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “मातृभाषेइतकीच हिंदी ही संपर्क भाषा म्हणून महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेबरोबरच एखादी परकीय भाषा आत्मसात केल्यास त्यांना भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन धवडे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी करून दिला. यावेळी कला शाखा प्रमुख प्रा. डॉ. अशोक शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांच्यासह विविध शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. किरण सोनवलकर यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!