विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक – नाना पटोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 10 मार्च 2022 । मुंबई । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणून ही निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतीय जनता पक्ष व माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून आज मोठी चपराक दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावी अशी आमची विनंती आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

विधिमंडळ आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करुन न्यायालयात याचिका दाखल करायची परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांची याचिका फेटाळत १२ लाख रुपयेही जप्त करुन मोठी चपराक दिली आहे. भाजपने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला कोर्टात आव्हान द्यायचे काम भाजपने बंद करावे. राज्यपाल महोदय यांना माझी विनंती आहे की त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा. राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल महोदय यांची काल भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील असा आमचा विश्वास आहे, असे पटोले म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!