उपळवे परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस


दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। फलटण। उपळवे, वेळोशी परिसरात मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह सुमारे तासभर मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटात संततधार पाऊस पडला. उपळवे, वेळोशी परिसरातील डोंगरावर काळ्या ढगांनी आकाश व्यापून गेले. त्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच दैना उडाली. सर्वत्र पावसाचे पाणीच पाणी झाले.

जोरदार पडलेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सखल भागात पावसाचे पाणी साठून राहिले. लहान मुलांनी पावसात भिजत पावसाचा आनंद लुटला. घरासमोर वाळविण्यासाठी ठेवलेले पदार्थ, तसेच उन्हात टाकलेले कपडे काढण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाली. वैरण झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरु झाली. शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर या पावसाने समाधान दिसत होते.

मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाने पावसात एकसारखी वाढ होत असल्याचे दिसून आले. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असल्याने अंगाची लाही लाही होत होती. या पावसाने कडक उन्हाने त्रासलेल्या जनतेची तगमग काही प्रमाणात शांत झाल्याचे दिसून आले.
या पावसाने शेतकरी राजा सुखावला असून हा पाऊस उन्हाळी पिकांना उपयोगी पडणार आहे. या पावसाने शेतीच्या मशागतीची कामे लवकरच सुरू होणार आहेत. खरीप हंगाम यावर्षी लवकर सुरू होण्याचा अंदाज दिसून येत आहे.
माण तालुक्यातील वारूगड, शिधी, भांडवली, श्रीपालवन, शेडगेवाडी, कळसकरवाडी, कुळकजाई, बोथे खोकडे, आवळे पठार, राजापूर तर फलटण तालुक्यातील वेळोशी, तरडफ, मानेवाडी, ताथवडा, दर्‍याचीवाडी, बोडकेवाडी, सावंतवाडी, उपळवे, दालवडी, मिर्‍याचीवाडी या भागामध्ये खरीपाच्या बाजरीच्या पेरणीस अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. दमदार पाऊस उन्हाळ्याच्या उत्तरार्धात झाल्यानंतर खरीप हंगाम शेतकरी लवकर सुरू करत असतो. या पावसाने पेरणीपूर्व मशागतीची कामांना वेग येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!