स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 3 : निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले होते. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेलेे. संरक्षक कठड्याच्या भिंती पडल्या. वार्यासह मुसळधार पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले.
काल रात्रीपासूनच येथे पावसाची बरसात सुरू होती. आज सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. अद्याप मान्सूनला सुरुवात झाली नाही तोच या चक्रीवादळामुळे नागरिक भयभीत झाले होते. पहाटे सुरू झालेल्या वादळी वार्यासह मुसळधार पावसाने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास थोडी उसंत घेतली. नगरीत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. या चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी फार मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे, मात्र सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.