दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । मुंबई । राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. मुंबई ठाण्यासह काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी केला होता. यात प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि पालघरचा भाग होता.
दरम्यान, आता पुन्हा एकदा पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान अंदाज
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
अखेर 15 तासांनी सुखरुप सुटका
पालघरमध्ये वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. यासर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं कामगार अडकले होते. अखेर तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.