दैनिक स्थैर्य | दि. ०६ मे २०२३ | फलटण | फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर यांच्या २० एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळींब बागेला भेट दिली. अहिरेकर त्यांच्या शेतामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाचे एकरी १० टन इतके दर्जेदार प्रतीचे उत्पादन घेतात. तसेच सुमारे ८० टक्के माल हा आखाती देशात आणि युरोपात निर्यात करतात. त्यांनी डाळिंबाची बाग अतिशय स्वच्छ ठेवली असून फळांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी झाडांवर आच्छादनाचा वापर केला आहे. अहिरेकर कुटुंब घेत असलेल्या कष्टाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक माजी केंद्रीय कृषिमंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केले.
फलटण शहरालगत असणाऱ्या वाठार निंबाळकर येथे चंद्रकांत अहिरेकर यांनी आधुनिक डाळिंब बागेची लागण केलेली आहे. या बागेची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज अचानक भेट दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कोठेही आधुनिक शेती किंवा शेतीमध्ये वेगळे प्रयोग जर कोण करत असेल तर अशा शेतीस खासदार शरद पवार हे स्वतः भेट देत असतात. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील चंद्रकांत अहिरेकर यांनी केलेल्या डाळिंब शेतीच्या आधुनिक प्रयोगाला खासदार शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
गेले काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विविध घडामोडी घडत होत्या. त्या घडामोडींवर काल पडदा टाकत आपणच राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा काल खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर लगेचच खासदार शरद पवार हे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी मार्गस्थ झालेले दिसून येत आहे. फलटण तालुक्यामधील वाठार निंबाळकर येथे असणाऱ्या डाळिंब शेतीला खासदार शरद पवार यांनी भेट दिली; यावेळी शेतकऱ्याकडून त्यांच्या शेती बद्दल माहिती करून घेतली.