दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । हत्तीरोग निर्मूलनासाठी शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात काम चालू असून या रोगावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. हत्तीरोगाला शून्य टक्क्यावर आणण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.
डहाणू, विक्रमगड व तलासरी (जि. पालघर) तालुक्यात वाढणाऱ्या हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. सावंत बोलत होते.
आरोग्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, महाराष्ट्र हे देशामध्ये सामुदायिक औषधोपचार मोहिमेमध्ये प्रथम क्रमांकाचे तर अंडवृद्धी शस्त्रक्रियांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यासंदर्भात सर्व पावले उचलली जात आहेत. हत्तीरोग दुरीकरणामध्ये राज्य निरंतर प्रगती करत आहे. राज्यातील अठरा हत्तीरोगग्रस्त जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, अकोला, जळगाव, अमरावती, वर्धा, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांनी संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाच्या (Transmission Assesment Survey-, ३) तीन फेऱ्या पास करून दूरीकरण साध्य केले आहे. उर्वरीत जिल्ह्यात (चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, नांदेड, यवतमाळ, नंदुरबार, ठाणे आणि पालघर) सुद्धा केंद्रशासनाच्या मागदर्शक सूचनांनुसार हत्तीरोग दुरीकरण कार्यवाही सुरु आहे. देशामधील हत्तीरोग समस्याग्रस्त राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, तेलंगणा, झारखंड, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल यांच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. पालघर जिल्ह्यामध्ये 8 लाख 6 हजार पात्र लोकसंख्येपैकी 7 लाख 50 हजार लोकांनी प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करुन 93 टक्के ‘कव्हरेज’ साध्य केले आहे. हत्तीरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डास नियंत्रण, रात्र सर्वेक्षण व नियमित उपचार, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, जीवशास्त्रीय उपाययोजना, आरोग्य शिक्षण यासारखे उपक्रम राबविले जात आहेत.
रक्तामध्ये हत्तीरोगाचे मायक्रो फायलेरिया हे जंतू आढळून येणे आणि प्रत्यक्ष हत्तीपाय रोग होणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. रक्तामध्ये मायक्रोफिलोरिया दिसून आल्यानंतर आयव्हरमेटिन DEC आणि अलबेनडेझोलची मात्रा दिल्यास पायामध्ये विकृती निर्माण करणारा हत्तीरोग होत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हत्तीरोग मोहिमेअंतर्गत नियमित सर्वेक्षण, बेस लाईन डाटा सर्वेक्षण, पोस्ट एम.डी.ए सर्वेक्षण व संक्रमण पडताळणी सर्वेक्षण कार्यक्रम आहेत त्यानुसार नियमित पथकाद्वारे तपासणी केली जाते. मागील ५ वर्षाच्या अहवालानुसार हत्तीरोग रोगजंतूंने दूषित रक्त नुमुन्याची संख्या 147 आहे. गेल्या 5 वर्षातील दूषित रक्त नमुन्याची संख्या वर्षानुवर्षे घटत आहे.
या प्रश्नाच्या वेळी शशिकांत शिंदे, डॉ. मिर्झा, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.