साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२३ । मुंबई । राज्यात पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी – अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हिवताप तसेच विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वर, चंडीपुरा मेंदूज्वर, तर कोकणात लेप्टो स्पायरोसिस, शहरी भागात डेंग्यू अशा विविध आजारांच्या साथी पसरतात. विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जोखीमग्रस्त गावांची निवड करून त्यांची यादी तयार केली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर शीघ्र प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या शीघ्र प्रतिसाद पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या पथकांमध्ये राज्यात ४ हजार १८० वैद्यकीय अधिकारी व १९ हजार १७१ कर्मचारी असणार आहेत. राज्यात ४ हजार ६७ गावे जोखीमग्रस्त असून राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात ४११ गावे जोखीमग्रस्त आहेत. तर धुळे, मुंबई जिल्ह्यात एकही गाव जोखीमग्रस्त नाही.

प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांचे पंधरवडा सर्वेक्षण कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. दैनंदिन सर्वेक्षणासाठी करावयाच्या गृहभेटीच्या वेळी जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येतो. जिल्ह्यातील आश्रमशाळा, वसतिगृह, वृद्धाश्रम अशा संस्थांना वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी नियमित भेटी देतात. जलजन्य आजारांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाणी स्त्रोतांचे प्रभावी गुणवत्ता नियंत्रण करण्यात येत आहे. विरंजक चूर्णाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात ७६ हजार ८६७ पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये ३५८० पाणी नमुने दूषित आढळले आहे.

दरवर्षी मान्सूनपूर्व सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचा सॅनिटरी सर्वे करण्यात येतो. त्यानुसार प्रत्येक गावाला हिरवे, पिवळे व लाल कार्ड दिले जाते. त्यानुसार राज्यात २७ हजार ८५३ गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये हिरवे कार्ड दिलेली गावे २४ हजार १३९ असून पिवळे कार्ड दिलेली गावे ३ हजार ६७५ आणि लाल कार्ड दिलेली गाव ३९ आहेत. साथरोग निदानासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, जोखमीच्या भागात कीटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर, डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाण्या, खिडक्यांना जाळ्या बसविणे व डास प्रतिरोधक क्रीम आदी एकात्मिक किटक व्यवस्थापन कार्यक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!