
स्थैर्य, सातारा, दि. 18 सप्टेंबर : गरोदर महिलांची माहेरात जशी ओटी भरली जाते तशीच ओटी 925 गरोदर मातांची पंचायत समिती वाई अंतर्गत वाई तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 16 सप्टेंबर रोजी भरण्यात आली. या ओटी भरणाचे निमित्त साधून सर्व गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कोणत्याही देशाचा विकास त्यांच्या अर्भक मृत्यु, बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण किती कमी आहे यावरुन मोजला जातो. हे प्रमाण कमी ठेवायचे तर गरोदर महिलांना आहार, आरोग्य तपासणी याचे योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळणे आवश्यक असते. पंचायत समिती वाई कार्यालयाने पुढाकार घेऊन आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून अशा सर्व गरोदर महिलांपर्यंत एकाच दिवशी पोचण्याची किमया साधण्यात आली. ग्रामपंचायत हे जणू गरोदर महिलांसाठी दुसरे माहेर बनले आहे.
महिला बालकल्याण च्या राखीव निधीतून गरोदर अवस्थेत घ्यायच्या पोषक आहाराची ओटी या महिलांना दिली. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सर्व अंगणवाडी ताई, मदतनीस यांनी आहाराची प्रात्यक्षिके दाखवून स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगीतले.
हा अभिनव उपक्रम राबवत हा कार्यक्रम पूर्ण तालुक्यात घेण्यात आला. काही ठिकाणी तर महिलांना सजवून त्यांना झोपाळ्यावर बसवून, फुग्यांची आरास करून, गाण्याच्या तालावर नृत्याच्या माध्यमातून ओटी भरत अगदी घरच्या ओटी भरणीची आठवण करून दिली. यावेळी अंगणवाडी ताईंनी काढलेली रांगोळीसुध्दा कल्पक आणि वेधक होती. अशा ओटी भरणीने भारावून जाऊन महिलांनी ग्रामपंचायत हे आमचे दुसरे माहेर आहे अशा प्रतिक्रिया दिल्या.