दैनिक स्थैर्य। दि. २३ डिसेंबर २०२२ । फलटण । मौजे सासकल ता. फलटण येथील सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांनी सासकल ग्रामपंचायत मध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेली तीन वर्षांपासून आंदोलन उभारले आहे. हे आंदोलन सनदशीर मार्गाने उभारले जात आहे. याचाच भाग म्हणून ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी फलटण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी सातारा व उप आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रार अर्जामध्ये तक्रारदारांनी त्रयस्थ समितीमार्फत सासकल ग्रामपंचायतीमधील आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी उपायुक्त,पुणे यांच्याकडे केली होती. उपायुक्त पुणे यांनी यासंबंधीचा त्रयस्थ समिती नेमून चौकशी करण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी सातारा यांना निर्गमित केला होता. त्यावर उपजिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना समिती नेमून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांनी पंचायत समिती दहिवडी माण चे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील व दोन विस्तार अधिकारी यांची समिती गठीत केली.
या समितीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिनांक १२/१०/२०२२ रोजी ग्रामपंचायत सासकल येथे येऊन प्राथमिक चौकशी करून तक्रारदार सासकल जन आंदोलन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांचे जबाब नोंदवले. यावेळी त्यांनी सासकल गावच्या विद्यमान सरपंच उषा फुले, विद्यमान ग्रामसेवक अशोक मिंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, अंगणवाडीच्या सेविका पुष्पावती मुळीक व छाया कुंभार यांच्याशी चौकशी करून साहित्य मिळाले की नाही अशी विचारणा केली. त्या दोघींनी व शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ यांनी साहित्य न मिळाल्याचे लेखी दिले. हेच सास्कल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अशोक मिंड व कर्मचारी पवार यांना ग्रामपंचायतीमध्ये काही साहित्य वाटायचे राहिले आहे का? एखादा बॉक्स वगैरे आहे का? असं विचारले असता त्यांनी अशा स्वरूपाचे कोणतेही साहित्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्जेराव पाटील यांनी दिनांक ४/११/२०२२ रोजी तक्रारदारांना सर्व मूळ कागदपत्रासह येण्यासाठी तारीख देण्यात आली. परंतु सदर तारीख ऐनवेळी बदलून १५/११/२०२२ ही तारीख देण्यात आली. परंतु सदर तारखेला जिल्हाधिकारी सातारा यांची गायरान जमिनी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक असल्याचे सांगून सदर तारीख बदलून १६/११/२०२२ ही तारीख देण्यात आली. या तारखेला सर्व कागदपत्राची पडताळणी केली. ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भ्रष्टाचार झाले असल्याची तक्रार करण्यात आली होती. ती सर्व ठिकाणी जाऊन पाहण्यात आली. यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यावेळी सासकल ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा फुले याही उपस्थित होत्या. त्यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. परंतु प्रत्यक्षात दाखवण्यात आलेली कामे त्यांना माहीत नसल्याचे लक्षात आले. यावेळी विद्यमान ग्रामसेवक अशोक मिंड यांना अनेक कागदपत्र, प्रोसिडिंग, रजिस्टर याची तपासणी व मागणी करण्यात आली. काही रजिस्टर उपलब्ध नसल्याचे व काही कागदपत्रे व प्रोसिडिंग नंतर देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर सर्जेराव पाटील यांनी दिनांक २/१२/२०२२ रोजी चौकशी अहवाल देण्यात येईल असे सांगितले. आज २२ तारीख उलटली तरीही माण तालुक्याचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांना अहवाल देण्यासाठी मुहूर्त सापडेना. त्यामुळे तक्रारदार व ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती व चौकशी समिती वरती नाराजी व्यक्त केली आहे.
सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थ यांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय अधिकारी तत्कालीन ग्रामसेवक अंगराज खाशाबा जाधव, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी,फलटण व सासकल ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला आहे. याप्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास या संदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही जन आंदोलन समिती व ग्रामस्थांनी दिला आहे.